स्थैर्य, मुंबई, दि. २१: नुकत्याच झालेल्या वादळामुळे मुंबई महानगरातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी तसेच मुंबईत लसीकरणात चालू असलेले गैरप्रकार थांबवावेत अशा मागण्या भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केल्या. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आ. अतुल शाह , महापालिकेतील भाजपा गटनेते भालचंद्र शिरसाट, विवेकानंद गुप्ता या प्रसंगी उपस्थित होते.
आ. भातखळकर म्हणाले की, मुंबईत वादळाने अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले आहेत. वादळाने, पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले.
छोट्या , मोठ्या रस्त्यांवर झाडे मोठ्या प्रमाणावर पडली . वर्दळीच्या मोठ्या रस्त्यांवरील झाडे महापालिकेकडून हटविली गेली. मात्र छोट्या रस्त्यांवर पडलेली , सोसायट्यांच्या भिंतींवर पडलेली झाडे अजून हटविली गेली नाहीत. झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोप आ. भातखळकर यांनी केला. महापालिकेच्या झाडं कापणीच्या कंत्राटाची मुदत मार्चमध्येच संपली आहे . हे कंत्राट महापालिकेत ज्यांनी अडवून ठेवले त्यांची चौकशी करा व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,अशी मागणीही आ. भातखळकर यांनी केली.
मुंबई महापालिकेकडून चालू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू आहे. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण चालू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू , असा इशाराही आ. भातखळकर यांनी दिला.