गिरवी सोसायटीत खासदार गटाची बाजी; माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पत्नी शारदादेवी पराभूत


फलटण तालुक्यातील गिरवी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पत्नी शारदादेवी कदम यांचा पराभव झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाने बाजी मारली. वाचा सविस्तर निकाल.

स्थैर्य, फलटण, दि. 08 डिसेंबर : फलटण तालुक्यातील गिरवी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. एकेकाळी विधानसभेवर वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या माजी आमदारांच्या कुटुंबाला आपल्याच गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे. कै. माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शारदादेवी कदम यांचा सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाला असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने येथे बाजी मारली आहे.

नेमका निकाल काय?

गिरवी सोसायटीचे कार्यकारी सदस्य प्रभाकर बाळासाहेब कदम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक पार पडली. या एका जागेसाठी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली. यामध्ये कै. माजी आमदार चिमणराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शारदादेवी कदम आणि प्रताप शामराव कदम हे आमनेसामने होते. या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जगदीश उर्फ बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे उमेदवार प्रताप कदम यांना ७ मते मिळाली, तर शारदादेवी कदम यांना केवळ ४ मते मिळाली. परिणामी, प्रताप कदम विजयी झाले.

सोसायटीही राखता आली नाही…

या निकालाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. एकेकाळी ज्या कुटुंबाचे विधानसभेवर एकहाती वर्चस्व होते, व सह्याद्री कदम यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची आहे त्या कुटुंबाला आता आपल्याच गाावातील साधी सोसायटीही राखता आली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फलटण तालुक्यात बदलाचे वारे जोरात वाहत असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!