दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२३ | फलटण |
सरडे (ता. फलटण) गावच्या हद्दीत महाविद्यालयीन मुलगी अभ्यास करत असताना तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिच्यासह तिच्या आई व भावासह लोखंडी रॉड व लाथाबुयांनी मारहाण केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश प्रकाश मोरे, मंगेश मोरे यांची भावजय व मंगेश प्रकाश मोरे यांची बायको (सर्व राहणार सरडे) अशी गुन्हा दाखल झालेले आरोपी आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सरडे (ता. फलटण) येथे पीडित मुलगी घरात अभ्यास करत बसली असताना मंगेश मोरे हा अचानक तिच्या घरात घुसून म्हणाला की, तू मला फार आवडतेस. असे म्हणून त्याने मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ती घाबरून ओरडून तिने त्यास बाजूला ढकलले. त्यावेळी तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याच्या भावास आमच्या मुलीची का छेड काढली, असे विचारले असता दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास मंगेश प्रकाश मोरे, मंगेश प्रकाश मोरे यांची बायको व मंगेश मोरे यांची भावजय असे मिळून पीडितेच्या घरात घुसून तिला व तिच्या घरातील आई, तिचा भाऊ अमित यांना मंगेश मोरे यांनी त्याच्या हातातील लोखंडी पाइपने तसेच त्याच्या बायकोच्या हातातील जिमच्या रॉडनी तसेच मंगेश मोरे याची भावजय यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून आम्हा तिघास मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. ह. गार्डे करत आहेत.