दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । फलटण । ‘घोडा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट ‘घोडा’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे.
मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अहोरात्र मेहनत करून धडपडणाऱ्या वडिलांची, वडील-मुलाच्या नात्याची विलक्षण गोष्ट ‘घोडा’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेला हा सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘घोडा’ या सिनेमात कैलास वाघमारे, अर्चना महादेव, दिलीप धनावडे, राहुल बेलापुरकर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टी. महेश यांनी सांभाळली आहे. तर जमीर अत्तार यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.
‘घोडा’ या सिनेमाची कथा काय आहे ?
बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतात का ? परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची अनोखी कहाणी ‘घोडा’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित सिनेमे झाले असले तरी हा सिनेमा नक्कीच वेगळा आहे. कष्टकरी आणि भांडवलदारी वर्ग यांच्या लढ्यात फुलणारं एक गोड स्वप्न म्हणजे ‘घोडा’ हा सिनेमा आहे.
हृदयस्पर्शी कथानक, कसदार लेखन, उत्तम कलाकार असलेला ‘घोडा’ हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्याही तितकाच दमदार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या ‘घोडा’ या सिनेमाचं कुतूहल चांगल्या ट्रेलरमुळे आता वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मनोरंजनासोबत एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोनानंतर सिनेरसिक पुन्हा एकदा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहत आहेत. ‘जग्गू आणि जुलिएट’ आणि ‘घर बंदूक बिर्याणी’ या सिनेमांसोबत ‘घोडा’ हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.