साखर कारखानदारांना अडचणीतून बाहेर काढा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १८ : महाराष्ट्र राज्य मध्ये साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ऊस उत्पादक शेतकरी ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी ही विस्तारत आहे. राज्य सरकार कडून साखर कारखानदारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. तरी साखर कारखानदारांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे मदत करावी, अशी आग्रही मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यातील साखर कारखानदारांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सद्यस्थिती केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे – पाटील, आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र मधील साखर कारखानदारांना कारखान्या बरोबरच इथेनॉल व को-जनरेशन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत करणे गरजेचे आहे. तर आणि तरच साखर कारखानदार टिकतील. राज्य सरकार कडून साखर कारखानदारांना कोणत्याही प्रकारचे मदत केली जात नसल्याने आगामी काळात केंद्र सरकारने साखर कारखानदारांना विविध योजनांद्वारे मदत करावी, अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

सध्या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून राज्य सरकार हे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यामध्ये अपयशी झालेले आहे. तरी आगामी काळात मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये केंद्राने लक्ष घालून विविध उपाय योजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सध्या महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षांतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती सुद्धा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली.


Back to top button
Don`t copy text!