दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर एक हजार, 17 कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. संस्थेची कर्ज फेडण्याची शक्ती व नव्याने कर्ज उभारण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. या दुर्दैवी परिस्थितीस विद्यमान अध्यक्ष मदन भोसले व त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी कारखाना व्यवस्थापनातून बाहेर पडावे किंवा हिमालयात जावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला आहे. दरम्यान, येणारा गळीत हंगामाचे नियोजन कसे असेल आणि ऊस उत्पादकांचे 55 कोटी रुपयांचे थकीत ऊस बील कधी देणार हे त्यांनी तातडीने स्पष्ट करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी नितीन पाटील, त्यांचे वडील- कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. लक्ष्मणराव पाटील व बंधू आमदार मकरंद पाटील यांच्यावर टीका केली होती. याला आज नितीन पाटील यांनी उत्तर दिले. श्री. पाटील म्हणाले, माझ्याकडे किसन वीर साखर कारखाना आणि प्रतापगड युनिट व खंडाळा युनिट अशा तिन्ही कारखान्यांचे त्यांनीच प्रसिद्ध केलेले सन 2019-20 चे ताळेबंद व नफा- तोटा पत्रके आहेत. त्यातील आकडेवारीनुसार किसन वीर उद्योग समुहावर एकूण एक हजार 17 कोटी रुपयांची कर्जे व देणी याचा बोजा असून, यास सर्वस्वी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना जबाबदार आहे.
आता ३२५ कोटींचे कर्ज असल्याचे सांगून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या मदन भोसले यांनी कारखान्यातून बाहेर पडावे किंवा राजकिय सन्यास घेऊन हिमालयात जावे. त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. सन 2003 पर्यंत आमचे वडील- कै. लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष होते. सत्तांतर होताना 2003 चा पहिला अहवाल जो स्वत: मदन भोसले यांनी प्रसिद्ध केला आहे. तो तात्यांच्या कारकिर्दीतील आहे. त्या अहवालामध्ये कारखान्यावर असलेली कर्जे 76 कोटी, 74 लाख, 68 हजार, 676 रुपयांची होती. 31 मार्च, 2003 रोजी जेव्हा सत्तांतर झाले, तेव्हा शिल्लक साखर 7 लाख, 40 हजार, 41 पोती इतकी होती.
त्या पोत्यांची ताळेबंदानुसार एकूण किंमत 91 कोटी, 53 लाख, 63 हजार, 987 रुपये इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात साखरेची दरवाढ झाल्यामुळे त्याही किमतीपेक्षा अधिक चढ्या भावाने ही साखर विकली गेली. याशिवाय तीन कोटी, 53 लाख, 23 हजार, 748 इतक्या रुपयांचे इतर उपपदार्थ शिल्लक होते. असे सगळे मिळून 95 कोटी, 6 लाख, 87 हजार, 736 रुपयांचा साखर व उपपदार्थांचा साठा शिल्लक होता. यावरून त्यावेळी कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता आणि कारखान्याचे नेटवर्थही प्लस होते. कारखान्याच्या या भक्कम आर्थिक स्थितीमुळे पुढील दोनवर्षे कमी गळीत होऊनही कारखाना आर्थिकदृष्ट्या तग धरून राहिला.