दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । येथील प्रशासकीय इमारतीच्या बाहेर मांजामध्ये गव्हाणी घुबड हे अडकले होते. ते फलटणच्या डल्बूएलपीआरएसच्या टिममधील सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने टीम मधील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनतर अडकलेल्या गव्हाणी घुबडाला जीवदान दिले व त्याच्यावर प्रथोमचार करून त्यास मुक्त केले. साधारण रात्रभर घुबड हे मांजामध्ये अडकुन पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फलटण व परिसरामध्ये डल्बूएलपीआरएस ही संस्था प्राणी व पक्षी यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी सुध्दा अनेक प्राण्यांना व पक्षांना वाचवुन जीवदान देण्याचे काम करण्यात आलेले आहे. सदरील संस्थेच्या माध्यमातून महेश धंगेकर, प्रा. अफजल खान, गणेश धुमाळ, शाहरुख शेख, सागर मारुडा, अभिजीत निकाळजे, साकेत अहिवळे, राज भागवत, अजित माने, रवी लिपारे हे सर्व युवक कार्यरत आहेत.
गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठी मध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत. उंदीर, घुशी, सरडे, पाली हे यांचे मुख्य खाद्य आहे.
गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात.