शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘गौरी-गणपती सजावट’ स्पर्धेचे आयोजन

विनामूल्य प्रवेश, विजेत्यांसाठी सोन्याच्या ठुशीसह आकर्षक बक्षिसे


स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : गौरी-गणपती उत्सवानिमित्त, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या फलटण तालुका आणि महिला आघाडीच्या वतीने फलटण शहर व तालुक्यातील महिलांसाठी ‘गौरी-गणपती सजावट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, विजेत्यांना सोन्याच्या ठुशीसह अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सदर स्पर्धेचे आयोजन पक्षाच्या उपनेत्या सौ. छाया शिंदे व महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रुक्मिणी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा संघटिका सौ. कल्पना गिड्डे व जिल्हा संघटिका सौ. कल्पना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. फलटण शहरातील संघटिका सौ. लता तावरे, शहर सहसंपर्कप्रमुख श्री. अक्षय तावरे आणि उपशहर संपर्कप्रमुख श्री. महेश खंडारे हे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी:

  • स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचे २ फोटो आणि ३० सेकंदांचा एक व्हिडिओ तयार करावा.
  • हे फोटो आणि व्हिडिओ, स्वतःचे नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह ८५५२९४६९१९ किंवा ९७६६५१३१४३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत.
  • फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८:०० वाजेपर्यंत आहे.
  • स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याची ठुशी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तर उत्तेजनार्थ विजेत्यांना ट्रॅव्हलिंग बॅग, डिनर सेट आणि ज्युसर यांसारखी बक्षिसे दिली जातील. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!