स्थैर्य, सातारा, दि. 20 : राहत्या घरात गॅस सिलिंडर गळतीने स्फोट होवून संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. यात जीवीतहानी झाली नाही. या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला.
मंगळवारी सायंकाळी हिराचंद काटकर यांच्या मुलीने स्वयंपाकासाठी गॅस पेटवला. सिलिंडर टाकी जोडावर लिक होत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान गॅस घरभर पसरला आणि अल्पावधीत आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये 100 किलो गह,t 50 किलो तांदूळ, जीवनावश्यक वस्तूंसह टीव्ही, फ्रीज, गॅस शेगडी, सोफासेट, शैक्षणिक साहित्य, सात हजाराची रोकड, कपडे जळून खाक झाले. आगीमध्ये घराचा पत्रा, लाकडी वासे, वीज साहित्य यासह सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
घरातील महिलांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा गॅसस्फोट आगीचा भयानक प्रकार असल्याची माहिती परिसरातील नागरिक व्यक्त करताहेत. नागरिकांच्या मदतीमुळे आग आटोक्यात आली असल्याने मदतकार्य करणाऱयांना सर्वजण धन्यवाद देताहेत. दहिवडी एच पी गॅस वितरक अभय तोडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. लॉकडाऊन काळात नुकसान झाल्याने जीवनावश्यक वस्तू भेट देऊन दिलासा दिला तर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.