
गारपीरवाडी (ता. फलटण) येथे स्वामी आबा नंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. व्यासपीठ चालक ह.भ.प. अनिल महाराज कुंभार. १ फेब्रुवारीला महाप्रसाद. वाचा सविस्तर कार्यक्रम…
स्थैर्य, फलटण, दि. २७ जानेवारी : परमपूज्य बम्हलिन महामंडलेश्वर वैराटवाडी स्वामी आबा नंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गारपीरवाडी (ता. फलटण) येथे ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहा’ची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. ग्रंथपूजन, कलशपूजन आणि वीणापूजनाने ग्रामस्थ, महिला मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत सप्ताहाचा मंगलमय शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यामुळे गारपीरवाडी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
अशी आहे दैनंदिन रूपरेषा
सप्ताहामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती, सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन आणि त्यानंतर हरिजागर असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. अनिल महाराज कुंभार (आळंदी) हे जबाबदारी भूषवणार आहेत.
भजनी मंडळाचा संच
सप्ताहासाठी मृदंगमणी म्हणून ह.भ.प. ओंकार महाराज दाणे (नांदल) हे साथसंगत करणार आहेत. तर गायनाचार्य म्हणून ह.भ.प. कांता भांडवलकर, बाळासाहेब जाधव, लहू फडतरे आणि दशरथ करे हे सेवा देणार आहेत. विणेकरी: ह.भ.प. लक्ष्मण शिंदे, ह.भ.प. घाडगे, ह.भ.प. तात्याबा रिटे. चोपदार: ह.भ.प. पंढरीनाथ गोडसे.
विशेष कार्यक्रम आणि महाप्रसाद
सप्ताहादरम्यान विविध अन्नदात्यांच्या हस्ते अन्नदान, चहा आणि पाणी वाटप करण्यात येणार आहे. उत्सवाचे विशेष कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:
-
शुक्रवार, दि. ३०/०१/२०२६: दुपारी २ ते ४ या वेळेत महिलांसाठी ‘हळदी कुंकू’ समारंभ.
-
शनिवार, दि. ३१/०१/२०२६: दुपारी ४ वाजता ‘दिंडी प्रदक्षिणा’ सोहळा.
-
रविवार, दि. ०१/०२/२०२६ (सांगता): ह.भ.प. सत्यवान महाराज जाधव (नांदल) यांचे ‘काल्याचे कीर्तन’ होणार आहे. कीर्तनानंतर ग्रामस्थ मंडळ गारपीरवाडी यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने या सोहळ्यात सहभागी होऊन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व महिला मंडळ, गारपीरवाडी यांनी केले आहे.
