
स्थैर्य, सातारा, दि. 01 : स्वच्छ भारत अभियानामध्ये देशभरात सातारा जिल्ह्याचा डंका सुरू असताना दुसरीकडे शहरात याच अभियानाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. प्रतापगंज पेठ येथील ऐक्य कॉर्नर ते अंजली कॉलनी दरम्यान जाणार्या मार्गावर असणार्या ओढ्यालगत कचर्याचे ढीग जागोजागी पाहायला मिळत आहेत. हाच कचरा वार्याने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात असल्यामुळे आरोग्याबरोबरच पाणी प्रदुषणाचा नवीन मुद्दा आता उपस्थित होणार आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात एकूण 1,495 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ग्राम -स्वच्छता अभियानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांनी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रशासन आणि गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, आरोग्य सेविका यांची उत्तम प्रकारे सांगड घालत या अभियानाचा श्रीगणेशा केला. हळूहळू या अभियानाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसह खाजगी विद्यालये व महाविद्यालयांनी ग्रामस्वच्छतेच्या मोहिमेमध्ये उडी घेतली. पाहता पाहता दहा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याचा कायापालट झाला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्लीत बोलून सन्मानित करण्यात आले.
सातारा जिल्ह्याने ग्रामस्वच्छता अभियानामध्ये अनेक पारितोषिके पटकावली. परजिल्हे व परराज्यातून अनेक मान्यवर सातारा जिल्ह्याने ही किमया कशी साधली हे पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध गावांना भेटी देऊन, तेथील स्थानिक ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले. खरेतर सातारा जिल्ह्याच्या इतिहासात ग्रामस्वच्छता मोहिमेसाठी काही पाने लिहिली जातील अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच जिल्ह्यातील काही शहरांना पुन्हा एकदा कचर्याचे ग्रहण लागले आहे. सातारा शहराबद्दल बोलायचे म्हटले तर सध्या या शहरात कचर्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. जागोजागी, गल्लीबोळात, रस्त्याच्या कडेला, ओढ्याच्या कडेला जिकडेतिकडे कचर्याचे ढीग दिसून येत आहे.
प्रतापगंज पेठ येथील ऐक्य कॉर्नर ते शाहूपुरीमधील अंजली कॉलनीकडे जाणार्या मार्गावर उतारावर एक ओढा आहे. या ओढ्याच्या कडेला जागोजागी प्लास्टिकसह अन्य कचरा टाकण्यात येत असल्यामुळे या परिसरात अस्वच्छता झाली आहे. या कचर्याच्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून माशा आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. बर्याचदा कडेला असलेला कचरा वार्याने ओढ्याच्या प्रवाहात पडून तो वाहून जात असल्यामुळे पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. संबंधित यंत्रणांनी येथे टाकण्यात येणारा कचरा रोजच्या रोज उचलून घेऊन जाऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.