मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची गणपतीची तिकिटे फुल्ल!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । मुंबई । बहुप्रतिक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे लोकार्पण होत आहे. २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. २८ जूनपासून ही सेवा नियमितपणे सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर या ट्रेनच्या तिकीट बुकिंगला सुरुवात झाली असून, गणपतीची तिकिटे फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या संकेतस्थळानुसार, मुंबई ते मडगाव या दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा असेल. तर मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू राहील. हे वेळापत्रक मान्सूनपुरते मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक सुरू आहे. यामुळे आठवड्यातून तीन दिवस ८ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-मडगाव मार्गावर धावणार आहे. मात्र, गणेशोत्सवासाठीची वंदे भारत एक्सप्रेसची तिकिटे फुल्ल झाली असून, १८ सप्टेंबरची प्रतिक्षा यादी १३० वर गेली आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १८१५ रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३३६० रुपये आहे. दुसरीकडे, मडगाव ते मुंबई या मार्गासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १९७० रुपये असून, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३५३५ रुपये आहे. एवढे तिकीट दर असूनही गणेशोत्सवासाठी वंदे भारत ट्रेन फुल्ल झाल्यामुळे या ट्रेनचे प्रवाशांनी जोरदार स्वागत केल्याचे सांगितले जात आहे. ०३ जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे लोकार्पण केले जाणार होते. मात्र, ओडिशातील बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी ट्रेन अपघातामुळे हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता.

दरम्यान, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सव, दिवाळी, दसरा तसेच इतर महत्त्वाच्या सणासुदीला मोठी गर्दी होते. मुंबईतून कोकणात नियमितपणे धावणाऱ्या सेवा असल्या तरी उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी होते. त्यासाठी कोकण रेल्वे जादा सेवा चालवत असते. नियमित सेवांच्या बरोबरीने आता ५३० आसन क्षमता असलेली वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे मान्सून वेळापत्रक

मुंबई ते मडगाव  थांबे आणि वेळ
CSMT पहाटे ५ वाजून २५ मिनिटे
दादर पहाटे ५ वाजून ३२ मिनिटे
ठाणे पहाटे ५ वाजून ५२ मिनिटे
पनवेल सकाळी ६ वाजून ३० मिनिटे
खेड सकाळी ८ वाजून ४८ मिनिटे
रत्नागिरी सकाळी १० वाजून ४० मिनिटे
कणकवली सकाळी १२ वाजून ४५ मिनिटे
थिविम दुपारी ०२ वाजून २४ मिनिटे
मडगाव दुपारी ०३ वाजून ३० मिनिटे

 

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे मान्सून वेळापत्रक

मडगाव ते मुंबई थांबे आणि वेळ
मडगाव दुपारी १२ वाजून २० मिनिटे
थिविम दुपारी ०१ वाजून ०६ मिनिटे
कणकवली दुपारी ०२ वाजून १८ मिनिटे
रत्नागिरी सायंकाळी ०४ वाजून ५५ मिनिटे
खेड सायंकाळी ०६ वाजून ४० मिनिटे
पनवेल रात्री ९ वाजता
ठाणे रात्री ०९ वाजून ३५ मिनिटे
दादर रात्री १० वाजून ०५ मिनिटे
CSMT रात्री १० वाजून २५ मिनिटे

Back to top button
Don`t copy text!