
स्थैर्य, कराड, दि. 20 : यंदा गणरायाच्या मूर्ती तयार करण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जाण्याची वेळ या क्षेत्रातील कुंभार समाजासह व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या वर्षी महापुराचा फटका आणि यंदा करोना महामारीचा हल्ला गणेशोत्सवावर चालून आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचा सावट असल्याने मुर्तीकारांसह व्यावसायीक देशोधडीला लागले आहेत.महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावात गणेशोत्सव साजरा केला जातो.
या उत्सवाची तयारी उत्सवपूर्व चार महिने मूर्ती निर्मितीपासूनच सुरू होते. यंदा दि. 22 ऑगस्ट 2020 ला गणरायाचे आगमन होणार आहे. वास्तविक पाहता गणेशोत्सव जसा धार्मिक उत्सव आहे, तसा तो अनेक जणांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मग यात जाती-पातीला दुय्यम स्थान आहे. मूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून ते श्रींच्या विसर्जनापर्यंत आवश्यक त्या सर्व साहित्यांनी दुकाने फूलून गेलेली असतात.
सातारा जिल्यात गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत उन्हाळ्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असते. मात्र, यंदा मार्च ते मे हे तीन महिने संपत आले तरी लॉकडाऊनमुळे जिल्यातील गणेशमूर्ती कार्यशाळेत सामसूम जाणवत आहे. त्यामुळे ‘हे विघ्नहर्ता जगावर ओढावलेले करोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर कर’ अशी विनवणी मुर्तीकार बाप्पाला करताना दिसत आहेत. शाडूच्या मुर्तीसाठी लागणारी माती तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीसाठी लागणारा कच्चामाल राजस्थान तसेच इतर राज्यातून येतो. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक ठप्प आहे. उंब्रज बाजारपेठेत सुमारे वीस ते पंचवीस गाड्या प्लॅस्टरची आवक होत असते. पण लॉकडाऊन अगोदर फक्त आठ ते दहाच गाड्या आल्या आहेत.
कच्च्या मालाचा अभाव आणि इतर अडचणींमुळे यंदा गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात अनेक अडचणी आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कच्चा माल, रंगाचे साहित्य, सजावटीसाठी लागणारे साहित्य यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणरायाच्या सार्वजनिक उत्सवावर व मूर्तीच्या उंचीवर मर्यादा येणार आहेत. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी मुर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. कामगार कामावर येत नसल्याने मालकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे येणारा गणेशोत्सव कसा होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.