दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जाधववाडी (फ), ता. फलटण येथील पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘पू. ना. गाडगीळ अँड सन्स’ आणि ‘पी एम डी मिल्क अँड फूडस् बारामती’ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महिलांना मोफत दूध आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ उद्योजक विक्रम झांझुर्णे, विक्रम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव मोहिते, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष रणधीर भोईटे, सरपंच सीमाताई गायकवाड, उपसरपंच राहुल शिंदे, माजी सरपंच हरिभाऊ जमदाडे, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य दीपक सपकाळ, सोनाली पवार, रेखा नाळे, सारिका चव्हाण, चंद्रशेखर जगताप, पू. ना. गाडगीळ अँड सन्सचे श्री. भोसले, मुनिष जाधव, राजाभाऊ कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, जाधववाडीचा सर्वांगीण विकास होत असताना उपस्थित ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा आता नागरिक म्हणणे उचित वाटते. पू. ना. गाडगीळ अँड सन्स आणि पी एम डी मिल्क यांनी महिलांच्या शारिरीक तंदुरुस्तीचा विचार करून त्यांना आणि लहान मुलांना पूर्ण अन्न म्हणून दुधाचे वाटप केले, याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. तसेच पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळाने हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचेही आभार आणि अभिनंदन करतो.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साहजिकच गणेशोत्सव हा सर्वांना एकत्रित आणण्याचा उत्सव आहे आणि तसा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून होत आहे. ज्या ठिकाणी महिलांची उपस्थिती अधिक असते, त्या मंडळाचे काम उत्तम सुरू आहे हे लक्षात येते. पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळ हे महिलांसह लहान थोर अशा सर्वांना बरोबर घेऊन काम करते आहे. याचाच अर्थ या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा मतितार्थ सफल होतो आहे.
मंडळाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात यावेत. सर्वांचा जास्तीत जास्त समावेश करून, सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जाता यावे अशा दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळ मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेशोत्सवा दरम्यान मंडळाने पूर्ण अन्न म्हणून परिसरातील महिलांना सलग दहा दिवस मोफत दुधाचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबवला. याचा परिसरातील महिलांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला आहे.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. राजाभाऊ कापसे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचलन केले.
ओम पवार, पृथ्वीराज सरगर, मोहसीन शेख, विराज घाडगे, आकाश जाधव, राजू ढालपे, अमित कुडुंबर, सुनिल नाळे, गणेश नाळे, सतिश जगदाळे, अनुज पवार, आर्यन बोके, अथर्व नाळे, अमन मारुडा, आकाश जाधव, श्रेयश भुजबळ, प्रसन्न सरगर, सागर मोरे, पार्थ नाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.प्रियांका सस्ते आणि शुभांगी पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.