
स्थैर्य, विडणी, दि. २२ ऑगस्ट : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विडणी (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत हे कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार असून, सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राजाळे येथील सुप्रसिद्ध ‘जानाई सांप्रदायिक भारूड मंडळा’च्या कार्यक्रमाने होणार आहे. शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता महिलांसाठी विशेष आकर्षण असलेला ‘वैनायक विमानाने खेळ पैठणीचा’ हा गायन व नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिलांसाठी पैठणी साडी, सोन्याची नथ आणि चांदीची जोडवी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता महिलांसाठी ‘सौभाग्यवान लेणं लुटा’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता महाआरती आणि लहान मुला-मुलींसाठी आकर्षक बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडेल. रात्री ९ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विडणीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.