दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । लोणंद । आगामी येणार्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सर्व नियम काटेकोर पाळावेत, असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी केले आहे.
लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्या गावांची गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सपोनी विशाल वायकर बोलत होते.
यावेळी बोलताना सपोनी वायकर म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद करण्यात यावी यामुळे जर अनुचित प्रकार घडत असेल तर त्यावर नक्कीच आळा बसेल. वजनी गणेशोत्सव मंडळामध्ये श्री गणेश मूर्तींवर कोणतेही दागिने अथवा अलंकार घालु नयेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत उत्सव काळामध्ये तयार होणारे निर्माल्य व इतर कचरा याची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चोखपणे पार पाडली पाहिजे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्या मंडळाच्या मार्फत किंवा मंडळाच्या सदस्यां मार्फत सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्य पोस्ट व्हायरल होणार नाही याची जबाबदारी मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे जर आक्षेपार्य पोस्ट कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आढळून आल्यास तर सदरील मंडळावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सपोनी वायकर यांनी यावेळी स्पष्ट केले.