
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण शहरात गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून जय्यत तयारी झाली आहे. कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन आणि सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : फलटण शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात केले जाते. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती दान केंद्रे, क्रेनची व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर
घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सांस्कृतिक भवन आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. ज्या नागरिकांना मूर्ती दान करायच्या आहेत, त्यांच्यासाठी पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजाजन चौक आणि उंब्रेश्वर चौक येथे मूर्ती संकलन वाहने ठेवण्यात येणार आहेत.
सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था
शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षक (लाईफ गार्ड) तैनात करण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मार्गावर आणि ठिकाणी अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका सेवा, पुरेशी स्वच्छता आणि आवश्यक विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
मंडळांसाठी क्रेनची सुविधा
सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी पंढरपूर पूल, बारामती पूल आणि शेती शाळा येथे क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्रेनच्या साहाय्यानेच मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.