सुपरफास्ट बेसिक गणित या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. शिवाजीराव जगताप, प्राचार्य रवींद्र येवले, डॉ अमिता गावडे पवार, गणेश नांदले, सौ स्मिता नांदले, प्रा. सतीश जंगम, अमोल फडतरे वगैरे
स्थैर्य, फलटण, दि. ७: अभ्यास करताना अनेकदा सरावासाठी व एखादी संकल्पना समजावून घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पुस्तकांचा चांगला फायदा होतो, त्यादृष्टीने गणेश नांदले यांचे सुपरफास्ट बेसिक गणित हे पुस्तक शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले. |
शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश नांदले यांनी लिहिलेल्या सुपरफास्ट बेसिक गणित या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात विशेष अतिथी म्हणून डॉ. जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी गणित तज्ञ प्राचार्य रवींद्र येवले होते, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, अमोल बुकचे अमोल फडतरे, सातारा जिल्हा कोचिंग क्लासचे अध्यक्ष प्रताप चव्हाण, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. जगताप म्हणाले, काही गोष्टी सोप्या स्वरुपात समोर आल्या तर त्याचे आकलन चांगले होते, गणितासारख्या विषयाची मनामध्ये फार मोठी भीती असते ही भिती घालविण्यासाठी गणितातील क्लुप्त्यांचे आकलन करुन घेऊन सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीने बेसिक गणित हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्राचार्य येवले म्हणाले, आपल्या मनातील नकारात्मक विचारच गणिताला अवघड बनवतो, स्पर्धा परीक्षेत आपण सकारात्मक राहिले पाहिजे. पुस्तकातील संकल्पना सोप्या व साध्या भाषेत असल्या पाहिजेत परंतू अनेकदा लेखकांचा तसा दृष्टिकोन दिसून येत नाही. कमीत कमी वेळेमध्ये उदाहरण सोडविण्याचे तंत्र प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मसात केले पाहिजे, वेळेचे भान ठेवून स्पर्धा परिक्षेला सामोरे गेल्यास यश हमखास मिळते. गणिती दृष्टीकोन व तर्क करणे गणितातील महत्त्वाचा भाग आहे. जो तर्क बरोबर करतो तो गणितात व स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतो म्हणून गणितात सातत्य असले पाहिजे त्यासाठी गणेश नांदले यांचे बेसिक गणित सर्वांना फायद्याचे ठरेल.
डॉ. अमित गावडे पवार व गणेश नांदले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरस्वती पूजनानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वागत अजित नांदले व सौ. स्मिता नांदले यांनी, सूत्रसंचालन व आभार प्रा. सतीश जंगम यांनी मानले.