
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर सोमवारी रात्री अकरा वाजता साताऱ्यातून धावत मशाल फेरी काढली. ही मशाल अंधेरीची पोट निवडणूक होईपर्यंत विझून देणार नाही असा निर्धार करत अहिवळे यांनी काढलेली मशाल फेरी चर्चेचा विषय ठरली शिवसेना ही शिवसैनिकांच्या मनामनात रुजली आहे तिला कोणी नाकारू शकत नाही हे बिंबवण्यासाठीच ही मशाल फेरी काढल्याचे गणेश अहिवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव बहाल केले मात्र शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालेले नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह मिळाल्याने त्या चिन्हाचे सार्वत्रिकीकरण करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे सातारा शहराचे उपशहर प्रमुख यांनी मशाल रॅलीची अफलातून कल्पना पुढे आणली केवळ कल्पनाच पुढे आणली नाही तर प्रत्यक्ष कृती सुद्धा केली.
रात्री अकरा वाजता धगधगती मशाल घेऊन अहिवळे यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि तेथून मशाल घेऊन पोवई नाका रयत शिक्षण संस्था कार्यालय, शाहू चौक तेथून राजपथावरून देवी चौक मोती चौक राजवाडा गोल बागेला वळसा घालून पुन्हा मोती चौक मार्गे राजपथावरून पुन्हा पोवई नाका असा पाच किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण होईपर्यंत ही मशाल आम्ही शिवसैनिक विझून देणार नाही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह रुजवण्यासाठी मशाल रॅली काढल्याचे गणेश अहिवळे यांनी सांगितले.