आंतरजातीय विवाह आणि सहभोजन याबद्दलची गांधी आंबेडकरांची भुमिका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । फलटण । ‘जग बदलायचे असेल तर आधी स्वत:ला बदला’ असे सांगणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आजच्या दिवशी गोळ्या झाडण्यात आल्या.परंतु गांधीजींचा संपला का?सत्य अहिंसेवर दृढ निष्ठा ठेवून त्या मार्गाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून देशाला मुक्त करणाऱ्या अनेक लढ्यांमधील गांधीजींच्या नेतृत्वाखाली दिलेला लढा हा निर्णायक ठरला.हिंसेच्या मार्गाने जेव्हा एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते.तेव्हा होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.” असे गांधीजी म्हणतात.तेव्हा हिंसेच्या मार्गानं मनुवादी सनातनी प्रवृत्तींनी गांधींना संपवले.परंतु म्हणून काही गांधीजी संपले का? ते संपले नाहीत.ते त्यांच्या विचाराने आजही जगभर स्वीकारले जातात.आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने आंतरजातीय विवाह व सहभोजन याबद्दलची गांधी आंबेडकरांची भूमिका याविषयी प्रस्तुत लेखात मांडणी केली आहे.✍️

१९२‍१ ते १९४७ या काळात महात्मा गांधीजींच्या वर्ण व जाती व्यवस्थेबाबतच्या मतांमध्ये हळूहळू बदल होत गेले.आरंभी गांधीजी सहभोजन व आंतरजातीय विवाह करणे हे अस्पृश्यता निवारण्यासाठी आवश्यक नाही.असे म्हणत परंतु नंतर मात्र त्यांच्या मतांमध्ये आमूलाग्र बदल झाले अगदी सुरुवातीला जातिव्यवस्था ही सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था आहे असे गांधीजी मानत असल्याने ते जातिव्यवस्थेचे समर्थक होते. मात्र काळानुरूप गांधीजींच्या विचारात यथोचित बदल होत गेले. विद्यमान जातिव्यवस्थेचे रूप भयावह आहे.या व्यवस्थेचा अभिमान वाटावा असे यात काहीही नाही. जातीची संख्या अमर्याद आहे यात असणार्‍या बंधनांमुळे माणसाला पूर्ण जखडून टाकले आहे त्यामुळे हा अप्रगतीचा मार्ग बनला आहे असे गांधीजी म्हणत.यावर उपाय सुचवताना ते म्हणतात उत्तम उपाय म्हणजे लहान लहान जातींना मोठ्या जातीत विलिन व्हावे या व्यवस्थेत फक्त चार मोठ्या जाती असाव्यात. त्या आधारावरच आपणास जुनी व्यवस्था म्हणजे वर्णव्यवस्था पुनर्स्थापित करता येईल.असे गांधीजी सुचवतात.थोडक्यात गांधीजींची वर्णाश्रम धर्मावर अपार श्रद्धा होती म्हणूनच ते २२/१/१९२५ च्या ‘यंग इंडिया’ च्या अंकात म्हणतात, “माझी वर्णाश्रम धर्मावर अपार श्रद्धा आहे.तरी मी भंग्यांबरोबर जेवतो.माझ्या योजनेत आंतरजातीय विवाहाला स्थान नाही. एवढेच मी सांगतो. ‘इतकेच काय पण राष्ट्रीय वाढीसाठी आंतरजातीय विवाह आणि सहभोजन आवश्यक आहे. ही माझी मते पाश्चात्य देशांतून आयात केलेली एक भोळी समजूत आहे.”असे मत गांधीजी २५/२/१९२० च्या ‘यंग इंडिया’ च्या अंकात नोंदवतात.एकूणच गांधीजी सहभोजन व आंतरजातीय विवाहाच्या विरोधी होते. त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांसंबंधी ते ७/७/१९४६ च्या ‘हरिजन’ च्या अंकात म्हणतात, “जर एखाद्या सुशिक्षित हरिजन मुलीने सवर्ण हिंदू बरोबर लग्न केले तर जोडप्याने अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला वाहून घ्यावे. एका हरिजन मुलीने चांगल्या वर्तणुकीचा शीलवंत सवर्ण हिंदू बरोबर लग्न केल्यास त्यामुळे सर्व हरिजन सवर्ण हिंदूंचे चांगले मित्र होतील. आणि हे चांगले उदाहरण होईल.सवर्ण हिंदू मुलीने आपले भावी पती म्हणून हरिजनांचा निवड केल्यास हे अधिक योग्य होईल मी माझ्या मार्गाने जावयाचे ठरवले तर ज्या मुलीवर माझे नैतिक वजन आहे अशा सवर्ण मुलींनी हरिजन पतीची निवड करावी असे मी त्यांना आवाहन करीन.”

वरील मताचा विचार करता गांधीजींच्या मतांमधील बदल हा प्रकर्षाने जाणवतो.२८ जुलै १९४६ च्या ‘हरिजन’ मध्ये ते म्हणतात, “सहभोजन हा अस्पृश्यता निवारण कार्यक्रमाचा आवश्यक भाग नाही. असे मी एकेकाळी म्हटले आहे. पण मी स्वतः सहभोजनवादी आहे. हल्ली मी या कार्याला उत्तेजन देतो.वास्तविक आज मी त्याही पुढे जात आहे.” विवाह ही सर्वस्वी व्यक्तिगत बाब आहे. कुणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरूद्ध लग्न करण्याची सक्ती करू शकत नाही. पण जातीच्या आधारावर आंतरजातीय विवाहांना मनाई करू नये.कोणत्याही विवाहांमधील वर किंवा वधू हरिजन नसेल तर मी अशा विवाहास हजर राहत नाही किंवा वधू वरांना आशीर्वाद देत नाही हे तुम्हाला आठवत असेलच. स्पर्श केल्याने माणसाला विटाळ होतो. या कल्पनेवर आधारलेली अस्पृश्यता आता इतिहासजमा झाली आहे.आता हरिजनांची सांस्कृतिक व आर्थिक उन्नती करण्याची आवश्यकता आहे ती केल्यास स्पृश्य आणि अस्पृश्य यामधील भेद संपून जाईल.”

गांधीजींच्या मधील बदलाचा परिणाम म्हणजे गांधीजींचे चिरंजीव देविदास यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या मुलीशी केलेले लग्न होय.हा विवाह पुणे येथील पर्णकुटी येथे संपन्न झाला. या आंतरजातीय आंतरभाषिक विवाहाचे पौराहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले. या विवाहात मुलगा गुजराती बनिया म्हणजे वैश्य होता मुलगी दक्षिणी ब्राह्मण होती. गांधीजींच्या अनुमतीनेच हा वैश्य ब्राह्मणांतला विवाह आनंदाने पार पडला.

महात्माजी पूर्णत: रक्ताने निळे रक्तधारी पक्के सनातन हिंदू होते. हे सत्य आहे.वेद, उपनिषदे, पुराणे आणि जे जे म्हणून हिंदू धर्माच्या नावाखाली येईल त्या सर्वांवर महात्माजींची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांचा अवतारांवर व पुनर्जन्मावर विश्वास होता.इतकेच नव्हे तर एका धर्मांध माणसाच्या इर्षेने त्यांनी तिचे समर्थनही केलेले आहे. सहभोजनाच्या सहपानाच्या व मिश्रविवाहाच्या ओरडीची त्यांनी निंदा केली असून आंतरजातीय भोजन न करण्याचा मी संयम पाळल्यामुळेच मी काही इच्छा शक्ती प्राप्त करू शकलो. व काही सामाजिक सद्गुणांचे रक्षण करू शकलो. असा त्यांनी युक्तिवादही केला. त्यांनी या आपल्या विसंगत व दांभिक विचारांचे स्वतःचेच खंडन केले व जातिभेद आध्यात्मिक व राष्ट्रीय विकासाला हानीकारक आहे. हे मत स्वीकारले ही मोठी चांगली गोष्ट आहे.त्यांच्या मुलाचा आंतरजातीय विवाह म्हणजे कदाचित या मतपरिवर्तनाचा परिणाम असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोंदवतात.’हरिजन’ मधील एका लेखात ते लिहितात,”आंतरजातीय भोजन आणि विवाह यांच्यावरील निर्बंधांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. ती केवळ एक सामाजिक रूढी आहे.बहुधा हिंदूधर्माच्या अवनतावस्थेत ती त्यात पेरली असावे. ही बंदी हिंदू समाजाला दुर्बल बनवित आहे. तिच्यावर सतत भर दिल्यामुळे जीवनाच्या दृष्टीने अधिक मूलभूत अशा गोष्टींपासून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे जात आहे. रोटीबेटी बंदीमुळे हिंदू समाजाचा विकास खुंटला आहे.” गांधीजींचे विचार १९२१ ते १९३४ या कालावधीत बदलत गेले.त्यांनी सहभोजना प्रमाणे आंतरजातीय विवाहाचाही पुरस्कार केला.१९४६ मध्ये तर त्यांनी जाहीर केले की, “माझ्या इच्छेला काही मान असेल तर माझ्या प्रभावाखाली येणाऱ्या सर्व हिंदू मुलींनी हरिजन नवरे निवडण्यास मी प्रवृत्त करेन.” अशाप्रकारे गांधीजींनी जरी या दोन्ही गोष्टींचा आग्रह धरला असला तरी सनातन यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी त्यांनी घेतली. त्यांनी ही चळवळ अस्पृश्यता निवारणापुरतीच मर्यादित ठेवली.आश्रमामधील लोकांना त्यांनी आंतरजातीय विवाह व सहभोजनास प्रवृत्त केले. परंतु आश्रमा बाहेरील लोकांवर त्यांनी यासाठी आग्रह धरला नाही
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहांचे समर्थन केले असून आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात घडवून आणणे हा सामाजिक अभिसरण वाढवण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे म्हटले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १५ एप्रिल १९४८ राेजी सविता कबीर म्हणजेच शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी दिल्ली येथील हार्डिज अॅव्हिन्यू या निवासस्थानी आंतरजातीय विवाह केला.या संबंधित दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की,’मी गुणांचा पूजक आहे. गुणांचा गौरव करताना गुणिजनांच्या स्त्री पुरुष पुरुषत्वाचा वा वयाचा विचार करू नये.’

जातीबाह्य विवाहाच्या कारणांचा खुलासा करताना ते म्हणतात,” जातीबाह्य विवाहाच्या मुळाशी आपण गुणांचे चाहते आहोत. आणि जाती विचाराने गुणांवर मात करता कामा नये.अस्पृश्यता हे जातीय विषमतेला आलेले सर्वात भयंकर असे फळ आहे. ज्या समाजाचे सामाजिक अभिसरण थांबते तो समाज मुर्दाड बनत जातो.आणि जात हा या अभिसरणाच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणावर घडवून आणणे हा अभिसरण वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे असे प्रतिपादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाहांचे समर्थन करतात त्यांनी नेहमीच जातीपेक्षा गुणांचा पुरस्कार केला आहे याचेच उदाहरण म्हणून त्यांनी प्रसिध्द नाटककार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी जेव्हा गोदूताई मुंगी यांच्याशी मिश्र विवाह केला तेव्हा आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या पत्रकातून त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.आचार्य अत्रे हे ब्राह्मण समाजातील होते. तर गोदूताई या वैश्य समाजातील होत्या. यांच्यासह लखनौ येथे असाच एक मिश्र विवाह संपन्न झाला. हा विवाह क्रांतिकारक होता.कारण या विवाहात वर हा अस्पृश्य चांभार व वधू ब्राह्मण समाजातील विधवा होती.या दोन्हीही विवाहितांचे डॉ.बाबासहेब आंबेडकरांनी अभिनंदन केले.

महात्मा गांधींचा अस्पृश्यतानिवारणाविषयीचा दृष्टिकोन सावकाश पण निश्चित बदलत गेला.सहभोजन आणि आंतरजातीय विवाह यांच्यावरील निर्बंध दूर करणे ही बाब अस्पृश्यता निर्मूलनात समाविष्ट होत नाही असे मी जेव्हा म्हणालो तेव्हा माझ्या मनातील सर्वसामान्य हिंदू जनतेचा विचार काँग्रेसजणांना करावाच लागेल.असा खुलासा १ फेब्रुवारी १९४२ च्या ‘हरिजन’च्या अंकात गांधीजींनी केला आहे.
थोडक्यात गांधी आंबेडकरांच्या आंतरजातीय विवाह सहभोजनाविषयीच्या मतांमध्ये बऱ्याच अंशी फरक जाणवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीपाती व धर्म यापेक्षा गुणांचा विचार करतात तर गांधीजी मात्र सामान्य हिंदूंचा विचार करून काही बाबतीत वर्ण व्यवस्थेचे समर्थन करतात. जरी ते जातिव्यवस्थेला नष्ट करण्याची भाषा करत असले तरी काही बाबतीत अस्पृश्यता निवारण विषयक भूमिकेमध्ये त्यांनी स्वत:ला मर्यादा घालून घेतल्या होत्या. डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये सर्व समाजातील कार्यकर्त्यांचा समावेश होता त्यांनी नेहमी जातीविरहित समाजनिर्मितीचा पुरस्कार केला. काही बाबतीत या दोघांच्याही भूमिका परस्परपूरक वाटतात.गांधीजी अगदी लहानपणापासून ज्या सनातन हिंदू मानसिकतेत वाढले त्या व्यवस्थेतून त्यांना बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला.त्यांच्यावर लहानपणापासून धार्मिक संस्कार झाले. त्यामुळे त्यांचा मानवतावाद हा धार्मिक स्वरुपाचा आहे. त्यांच्या संकल्पनेतील हिंदू धर्म हा उपनिषदे व गीतेतील शिकवणुकीवर आधारित होता. म्हणूनच ते स्वतःचे वर्णन गीतेतील कर्मयोगी म्हणून करतात. ईश्वर हा स्वर्गात वा दुसर्‍या कोठेही नसून तो प्रत्येक प्राणीमात्रात आहे.त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे मोक्ष मिळणे असा अद्वैत वेदान्ताचा सिद्धांत गांधीजी मानीत.एकूणच ते वेदांता बरोबर गीतेतील वर्णाश्रम पद्धतीचाही पुरस्कार करतात.

गांधीजी जरी सुरवातीला आंतरजातीय विवाह व सहभोजन यांची अस्पृश्यता निवारणासाठी जरुरी नाही असे म्हणत असले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये अमुलाग्र बदल होत गेला.त्यामुळे स्वत:ला सनातन हिंदू मानणारे गांधीजी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला अग्रक्रम देऊ लागले.६/८/१९३१ चहा यंग इंडिया मध्ये गांधीजी म्हणतात अस्पृश्यतेचा कलंक न पुसताच जर आपण सत्तेवर आलो तर आतापेक्षाही स्वराज्यातच अस्पृश्यतेचा जास्त त्रास सहन करावा लागेल.वयाच्या बाराव्या वर्षी अस्पृश्यतेची ओळख झालेल्या गांधीजींना त्या वयात हे पटवून सांगताही आलं नाही आणि घेताही आले नाही.परंतु काळानुरूप त्यांच्या मतांमध्ये त्यांनी बदल करवून घेतला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला नगण्य स्थान देणारे गांधीजी त्यांचा आदर करू लागले म्हणूनच ते एके ठिकाणी म्हणतात,”मी जर आंबेडकरांच्या जागी असतो तर मी ही त्यांच्या सारखाच संतप्त झालो असतो. त्यांनी खरोखरच आपल्याला जोड्याने मारले तरी ते आपण सहन केले पाहिजे.मात्र आपण त्यांना घेऊ नये.”(” Had i been in Dr. Ambedkars place i would have been as angry if he really hits us with shoes we must bear even that but we should not be afraid of him.” )

गांधीजींनी मध्ये झालेला बदल हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना त्यामुळे अस्पृश्यतेची जाणीव झाली शेवटी गांधीजींनी प्रतिज्ञा केली की, “आंतरजातीय विवाह नसेल तर मी अशा विवाहांना जाणार नाही किंवा आशीर्वादही देणार नाही.”

सोमिनाथ पोपट घोरपडे, प्रकल्प अधिकारी
प्रगत शिक्षण संस्था फलटण
इमेल : [email protected]
मो.नं.७३८७१४५४०७


Back to top button
Don`t copy text!