गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!


स्थैर्य,पुणे, दि.२१:  कुख्यात गूंड गजा मारणे याची काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहातून सुटका झाली त्यानंतर त्याची वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली होती. या मिरवणूकीत असलेल्या आलिशान गाड्या आता पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी गाड्या पूरवल्याबद्दल त्याच्यासह आणखी 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, वडगावशेरीच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राहूल दळवी यांनी नारायण गलांडे यांची लॅंड क्रुझर गाडी कामानिमित्त नेली होती. याच गाडीमधून गजा मारणेची मिरवणुक काढण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणी सक्त पाऊले उचलण्यास सुरू केल्यानंतर राहूल दळवी फरार झाला होता पण पुणे पोलिसांनी दळवी यांच्यासह आठ जणांना आता अटक केली आहे. नारायण गलांडे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या लॅंड क्रुझर या दोन कोटी किंमतीच्या गाडीला पोलिसांनी जप्त केलं आहे.

लॅंड क्रुझरसारख्या इतरही आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मालकही चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या सर्व प्रकरणातील मुख्य गजानन मारणे सध्या फरार आहे. वारजे पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या सध्या त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, गजा मारणेचा बॅंक तपशील व मालमत्तेचा तपशिल पोलिस तपासत आहेत तसेच, ठराविक वेळेत जर गजा सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्याची तयारीही पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!