खंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्प अनुषंगाने एकूण 100 उपग्रह तयार करण्यात आले असून सात फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे.
या उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अर्थव संतोष नेवसे (ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ), मो. हाफिज अशपाक पटेल, (राजेंद्र विद्यालय खंडाळा ), वैष्णवी विलास गायकवाड (अनंत न्यू इंग्लिश स्कूल सातारा), राजवर्धन प्रमोद पाटील (स्व. दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे) व ललित गजानन वाडेकर (लालबहाद्दूर शास्ञी कॉलेज सातारा) यांचा समावेश आहे. या अंतराळ मोहिमेसाठी देशभरातील एक हजार सहभागी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 360, तर सातारा शहरातील पाच प्रतिभावान विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली आहे.
7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम येथून हे शंभर उपग्रह अंतराळात एकाच वेळी सोडले होणार आहेत. यासंबंधी पुणे येथे आज मंगळवारी (ता. 19) एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. तसेच या विद्यार्थ्यांचे सहा दिवसांचे उपग्रह निर्मितीविषयी ऑनलाईन प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रमासाठी हे पाच बालवैज्ञानिकांची निवड व्हावी ही गौरवाची बाब मानली जात आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या महत्त्वाकांक्षी मोहिमसाठी जागतिक वितरणासाठी बाल वैज्ञानिक विद्यार्थी सज्ज झाले असून या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जगातील सर्वात कमी वजनाचे (25 ग्रॅम ते 80 ग्रॅम ) 100 उपग्रह बनवून त्यांना पंचवीस ते तीस हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलूनद्वारे हे उपग्रह प्रस्थापित केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे अवकाश क्षेत्रात विद्यार्थ्यांना आवड निर्माण होऊन, विद्यार्थी आपले करिअर बनवू शकणार आहेत.