जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२३ । पुणे । जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले, तर लाल महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेत स्तिमितही झाले.

सकाळी शनिवारवाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले. येथे पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला. तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले. गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखल्याने पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. यावेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला. पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या. शनिवारवाडा आवारात लावण्यात आलेल्या आर्टिफिशयल ज्वेलरी, कलाकुसरीच्या वस्तूंच्या स्टॉलमधील बांगड्या, कानातील आभूषणांनी महिला प्रतिनिधींना आकर्षित केले.

अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली.

यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!