
स्थैर्य,जळगाव, दि.१५: यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ 15 जानेवारी रोजी घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. या 15 जणांमध्ये रावेर तालुक्यातील आभोडा गावातील सर्वाधिक 11 जणांचा समावेश आहे. या अपघातामुळे आभोडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या सर्व 11 जणांची अंत्ययात्रा आभोडा गावातून एकाच वेळी निघाली. या दृदयद्रावक घटनेमुळे गावातील एकाही घरात सोमवारी चूल पेटलेली नाही. एकाच वेळी 11 जणांचा मृतदेह बघून गावातील नागरिक तसेच मृतांच्या कुटुंबीयांनी हृदय हेलावणारा आक्रोश केला.
अपघात कसा झाला?
जळगावच्या यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Road accident) एकूण 15 जणांचा मृत्यू झाला. यावल तालुक्यातील किनगाव परिसरात हा अपघात झाला. साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. यातील तब्बल 15 जण या अपघातात मरण पावले. मृतांपैकी 11 जण हे आभोडा गावातील आहेत. या सर्व 11 जणांची अंत्ययात्रा सोबतच निघाली. हे दृष्य हृदय हेलावून टाकणारे होते. यावेळी अंत्ययात्रेत आभोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने ही अंत्ययात्रा निघाली. या घटनेमुळे गाव सुन्न झाले आहे.
एकाच कुटुंबातील 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू
या घटनेत आभोडा गावातील एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. मोरे, वाघ व भालेराव कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेविषयी माहिती देताना मृतांचे नातेवाईक पद्माबाई तसेच वामन वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. “या घटनेमुळे आमचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. आम्ही उघड्यावर आलो आहोत. काळ आमच्यावर एवढा का रुसला?, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. “आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. राज्य शासनाने आम्हाला काहीतरी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राज्य सरकारकडून मदत जाहीर
हा अपघात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघातामुळे पंतप्रधानं नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मृतांत्या कुटुंबाप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. ही घटना घडताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली जाणार आहे.
मृत नागरिकांची नावं
1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार – वय 30 रा. फकीर वाडा रावेर
2) सरफराज कासम तडवी – वय 32 रा. केऱ्हाळा
3) नरेंद्र वामन वाघ – वय 25 रा. आभोडा
4) डिंगबर माधव सपकाळे – वय 55 रा. रावेर
5) दिलदार हुसेन तडवी – वय 20 रा. आभोडा
6) संदीप युवराज भालेराव – वय 25 रा. विवरा
7) अशोक जगन वाघ – वय 40 रा. आभोडा
8) दुर्गाबाई संदीप भालेराव – वय 20 रा. आभोडा
9) गणेश रमेश मोरे – वय 05 वर्ष रा. आभोडा
10) शारदा रमेश मोरे – वय 15 वर्ष रा. आभोडा
11) सागर अशोक वाघ – वय 03 वर्ष रा. आभोडा-
12) संगीता अशोक वाघ – वय 35 रा. आभोडा
13) सुमनबाई शालीक इंगळे – वय 45 रा. आभोडा
14) कमलाबाई रमेश मोरे – वय 45 रा. आभोडा
15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा. आभोडा