स्थैर्य, फलटण दि.11 : माण खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे – कटापुर ) केंद्रशासनाच्या जल शक्ती मंत्रालया मार्फत राबवली जात आहे. 2022-23 मध्ये ही योजना पूर्ण कार्यान्वित करून 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निर्माण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने मधून 100 टक्के निधी प्राप्त व्हावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी वरील विनंती त्यांनी केली.
सदर योजनेबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, माण – खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापुर ) केंद्रशासनाच्या जल शक्ती मंत्रालया मार्फत राबवली जात आहे. यामध्ये माण – खटाव तालुक्यातील 67 दुष्काळी गावांचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी 1061.34 कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा निधीही प्राप्त झालेला आहे. 2020 अखेर या प्रकल्पावर 587.68 इतका खर्च झालेला आहे. सद्यपरिस्थितीत जिहे-कठापूर बॅरेज चे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. 20-21 मध्ये 0.35 टीएमसी पाणी साठा करण्याचे नियोजन आहे. 2022-23 मध्ये ही योजना पूर्ण कार्यान्वित करून 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने मधून 100 टक्के निधी प्राप्त व्हावा, अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधानांना भेटीदरम्यान केली आहे.