तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । चंद्रपूर । गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव गावातील मूलभूत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. या गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी ग्वाही  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

तोहगाव येथे आयोजित सत्कार समारंभ व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवराव भोंगळे, संजय धोटे, सुदर्शन निमकर, नामदेव डाहुले, दीपक सातपुते, बंडु गौरकार, तोहगावचे सरपंच अमावस्या ताळे, उपसरपंच शुभांगी मोरे, मदन खामनकर, अतुल बुक्कावार, संजय उपगन्लावार, प्रकाश उत्तरवार, सुरेश धोटे, श्यामराव नारेलवार, संदीप मोरे, हंसराज रागीट आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 92 लाख रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन यावेळी श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, जल है तो जीवन है. तोहगावला आता दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही. भविष्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल हे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न तोहगावातही मूर्त रूप घेत आहे.

तोहगावातील मूलभूत कामांच्या विकासाला चालना देण्यात येईल. गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी 50 लाख रुपयांची घोषणा यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी केली. रस्ते व जलनिस्सारणाची कामे यातून करण्यात येतील. तोहगावात ग्राम पंचायतच्या माध्यमातून वाचनालय उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. मुनगंटीवार यांनी यासाठी मदत करणार असल्याचा शब्द दिला. तोहगाव भागातील रस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पातून तरतूद व्हावी, यासाठी पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार सामान्यांच्या आणि गोरगरीबांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. गावातील तरुण-तरुणींच्या पाठिशी केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी उभे आहे, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. आता शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये थेट जमा होणार आहेत. तोहगावातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी गावातीलच सुशिक्षित तरुणाईने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सुटलेल्या शेतकऱ्यांची नावेही लवकरच समाविष्ट करण्यात येतील. आता शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांचे कोणत्याही कारणाने निधन झाले तरी त्याचे कुटुंब उघड्यावर येते. त्यामुळे आपण अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश अशा कारणांसाठी मिळणाऱ्या मदतीत वाढ केली. हे करून आपण शेतकऱ्यांप्रती असलेले आपले कर्तव्य निभावले. 2018 नंतर शेतकरी कुटुंबातील सदस्यांना अशा विम्याचा लाभ मिळत आहे. आता त्याही पुढे पाऊल टाकत सरकारने निर्णय घेतलाय की अशा शेतकरी कुटुंबांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पालकमंत्र्यांची धान्यतुला : सुधीर मुनगंटीवार यांची धान्यतुला तोहगावात करण्यात आली. यावेळी नांगर भेट देण्यात आले. धान्यतुलेतील धान्य शेतकऱ्यांच्या घामाचे, कष्टाचे असल्याने सुवर्ण तुलेपेक्षाही तोहगावातील धान्य तुला आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटते, अशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या आयुष्यातील ही धान्यतुला आपल्याला कायम स्मरणात राहिल असेही त्यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!