ऑनलाइन राख्या पाठवण्याचा फंडा; दुकानदार चिंताग्रस्त


50 लाखांच्या उलाढालीवर पाणी पडणार

स्थैर्य, सातारा, दि. 30 : सोमवार, दि. 3 ऑगस्ट रोजी असणार्‍या रक्षाबंधन या पवित्र सणावर  करोनासह आर्थिक मंदीचे सावट दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाजारात राख्यांचे स्वतंत्र स्टॉल नाहीत. राखी खरेदी करण्यासाठी महिला दुकानाकडे फिरकत नसल्यामुळे दुकानदार चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी हातावर राखी बांधून भावाला ओवाळण्याची प्रथा खंडित होणार असल्याने बहुतांश बहिणी आपल्या भावाला ऑनलाइन राखी पाठवण्यावर भर देणार असल्याची शक्यता  आहे.

दरवर्षी रक्षाबंधनाच्या अगोदर आठ दिवस सातारा शहरात ठिकठिकाणी नानाविध प्रकारच्या राख्यांचे स्टॉल लावण्यात येतात. राजवाडा, पोवई नाका, बसस्थानक परिसर, जिल्हा पोलीस मुख्यालय मार्गांवर मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावण्यात येतात. नानाविध रंगाच्या आकर्षक राख्या खरेदी करण्यासाठी युवती व महिला चार दिवस अगोदरच बाजारपेठेत झुंबड उडवतात. यावर्षी मात्र मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यात करोनाने शिरकाव करत चांगलाच उच्छाद मांडला आहे. सलग तीन महिने लॉकडाउन, नंतर पूर्णत:, अंशत: लॉकडाउन यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापार्‍यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. सण साजरे करण्यावर मर्यादा येऊ लागल्या.

गेल्या काही दिवसात सातारा शहरात  करोना  बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यामुळे ही संख्या आटोक्यात आली नाही तर कोणत्याही क्षणी मोठा लॉकडाउन पुन्हा एकदा केला जाऊ शकतो, या भीतीपोटी सातार्‍यातील अनेक दुकानदारांनी अल्प प्रमाणात राख्यांची मागणी केली आहे. राख्यांसाठी स्वतंत्र स्टॉल न टाकता किराणा मालाच्या दुकानात राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. किराणा मालाचे दुकान हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे या दुकानदारांनी अत्यंत अल्प प्रमाणात राख्या उपलब्ध केल्या आहेत. राख्यांची विक्री न झाल्यास  गुंतवलेल्या पैशावर अक्षरश: पाणी पडणार असल्यामुळे दुकानदार आशेने राखी खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांकडे नजर लावून बसले आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबला नाही तर लॉकडाउन आणखी वाढू शकतो ही बाब लक्षात घेता यावर्षी बहुतांश बहिणींनी ऑनलाइन राख्या पाठविण्याची मनाची तयारी करून ठेवली आहे. राखी बांधायला जायचे म्हटले तरी संबंधित भावाला परगावातून आल्यामुळे बहिणीच्या गावात प्रवेश मिळणार का? राखी बांधताना अथवा ओवाळणी करताना फिजिकल डिस्टन्स पाळणार का यासारखे अनेक मुद्दे उपस्थित होणार असल्यामुळे बहुतांश महिलांनी यावर्षी रक्षाबंधन नकोच असा पवित्रा घेतल्यामुळे त्याचा राख्यांच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी राख्यांचे स्टॉल लावण्यात येतात. सातारा तालुक्यातून विविध गावांमधून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येणार्‍या महिला यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असे. त्यामुळे दरवर्षी सातारा शहरात राखीच्या विक्रीतून 50 लाखांच्यावर उलाढाल होत असे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. एस.टी. बसेसही बंद असल्यामुळे सातारा तालुक्यातून शहरात खरेदी करण्यासाठी येणार्‍यांची संख्या अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे सातारा शहरात राख्यांच्या माध्यमातून होणार्‍या 50 लाखांच्या उलाढालीवर पाणी पडणार आहे, अशी माहिती एका राखी विक्रेत्याने दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!