स्थैर्य, सातारा, दि.१९: साताऱ्यातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण आणि इतर ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अडीच कोटींचा निधी देण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिल्या आहेत. याबाबतची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती.
साताऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील काही वास्तू ओघात नामशेष झाल्या आहेत. उर्वरित वास्तुंचे जतन करण्यासाठी उदयनराजे आग्रही आहेत. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरण काम, निधीबाबत नुकतीच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे ऐतिहासिक वास्तुंच्या देखभालीसाठी “नियोजन’मधून निधीची मागणी केली होती. त्यानुसार छत्रपतींच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी दुसऱ्या टप्यातील अडीच कोटींचा निधी तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच महाराणी ताराराणी समाधी स्मारक, ऐतिहासिक वास्तू सुशोभीकरणासाठी “जिल्हा नियोजन’मधून निधी देण्याचे ठोस आश्वासन दिल्याची माहिती उदयनराजेंच्या कार्यालयाकडून देण्यात आली.