स्थैर्य, सातारा, दि. २७: घरफोडीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल चोरट्यास सातारा एलसीबीच्या पथकाने बिदर कर्नाटक येथून जेरबंद केले. त्याच्याकडून सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्यांबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील गुन्हे उघड झाले आहेत.
याबाबात माहिती अशी, दि. 30 एप्रिल 2017 आणि 03 मे 2017 रोजी अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून 69 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच छडा लावण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक, रमेश गर्जे व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी सातारा जिल्हा पोलीस अभिलेखावरील अट्टल घरफोडी चोरी करणार्या आरोपीची माहिती काढून त्यास अलीयाम्बुर, ता. जि. बिदर (कर्नाटक) येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्यासोबत त्याने कर्नाटक राज्यातील बिदर येथील घरफोडीचा 1 गुन्हा व हैद्राबाद येथील मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा असे एकुण 03 गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. आरोपी सातारा शहर पोलीस ठाण्याकडील 5 गुन्हयात व शाहुपुरी पोलीस स्टेशन कडील 7 अशा एकुण 12 गुन्हयात फरारी होता.
ही कारवाई ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार सफो जोतिराम बर्गे, पोहवा अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रमोद सावंत, विशाल पवार, अमित सपकाळ, गणेश कापरे, अजित कर्णे, रोहित निकम , सचिन ससाणे, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला.