दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । सांगली । महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत थेट उत्पादक ते ग्राहक विक्रीसाठी महोत्सवाचे आयोजन करण्याकरिता फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी व पणनशी संबंधित असलेल्या सहकारी संस्था, शासनाचे विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था घेऊ शकतात.
महोत्सवाचा कालावधी हा किमान पाच दिवसाचा असणे आवश्यक आहे. महोत्सवात प्रति स्टॉल दोन हजार रूपये याप्रमाणे अर्थसहाय अनुज्ञेय, भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त असल्यास प्रति स्टॉलसाठी तीन हजार रुपये याप्रमाणे अर्थसाह्य देय, महोत्सवामध्ये किमान दहा व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय, महोत्सव आयोजनापूर्वी कृषी पणन मंडळाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आणि महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रस्ताव पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी पणन मंडळाचे मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालय येथे संपर्क साधावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.