
स्थैर्य, मुंबई, दि. २०: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट असोसिएशनकडून कोविड-१९ च्या उपचाराकरिता ५५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
आज मंत्रालयात फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनादेश सुपूर्द केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी व कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, व इतर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यापूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट असोसिएशनने (व्यापारी संस्था) ५५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
यावेळी फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट असोसिएशन अध्यक्ष संजय पानसरे, अशोक हांडे, नसीम सिद्दिकी, बाळासाहेब भेंडे संघटनेचे प्रतिनिधी आणि सबंधित अधिकारी उपस्थित होते.