दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस. टी.) कर्मचाऱ्यांचे आंदोलनातील एकजूट प्रेरणादायी आहे, या कर्मचाऱ्यांनी गेल्या ६० वर्षाहुन अधिक काळ याच एकजुटीद्वारे सामान्य प्रवाशांसह वृद्ध, महिला, अंध, अपंग, विद्यार्थी यांना सुरक्षीत प्रवासाची हमी दिल्याने एस. टी. लोकप्रिय झाली किंबहुना समाजातील सर्वसामान्य प्रवाशांसह या घटकांच्या प्रवासातील हक्काचे साधन झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर आता आंदोलनात योग्य व सन्मान्य तोडगा निघण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले आहे.
एस. टी. अप्रेंटीस संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष व श्रीकृष्ण उद्योग समुहाचे प्रमुख बाळासाहेब ननावरे यांच्यावतीने फलटण आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांना मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा व भाजीपाला किट वितरित करण्यात आले, त्यावेळी अरविंद मेहता बोलत होते. यावेळी फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, प्रवासी संघटनेचे प्रा. शिवलाल गावडे, नंदकुमार ननावरे, कृष्णराज ननावरे, सुखदेव अहिवळे, माऊली कदम, आंदोलन कर्ते एस. टी. कर्मचारी उपस्थित होते.
सर्वसामान्य प्रवासी प्रामुख्याने वृद्ध स्त्री – पुरुष, अंध, अपंग, मतीमंद, विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना तिर्थक्षेत्रापासून रुग्णालयांपर्यंत, शाळा महाविद्यालयांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात एस. टी. कर्मचाऱ्यांनी जपलेल्या अनोख्या माणूसकीच्या नात्यातून एस. टी. प्रवासी व एस. टी. कर्मचारी यांचे एक अतूट, अभेद्य नाते निर्माण झाले आहे त्याची जपणूक करण्यासाठी आंदोलन कर्त्यांना नोटीसा पाठवून, दडपशाहीने नव्हे तर हळूवार फुंकर घालुन या आंदोलनात सन्मान्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, शासन प्रशासनाने फार कठोर भूमिका न घेता कर्मचाऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत, त्यादृष्टीने शासन प्रशासन सकारात्मक होताना दिसते आहे, कर्मचाऱ्यांनी त्यांना योग्य प्रतिसाद देवून सन्मान्य तोडगा काढण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा अरविंद मेहता यानी व्यक्त केली आहे. एस. टी. सर्वसामान्यांची मालमत्ता आहे, ती टिकली पाहिजे किंबहुना अविरत सुरु राहिली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतानाच एस. टी. कर्मचाऱ्यांना केवळ वेतनवाढ देवून चालणार नाही, ती मंडळी या समाजाचा एक भाग असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य, शिक्षण, निवास या मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार झाला पाहिजे, आज वाढती महागाई आणि असुरक्षीततेच्या पार्श्वभूमीवर त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून खात्री दिली पाहिजे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.
फलटण शहर पोलिस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी कामगारांनी आंदोलन अतिशय योग्य प्रकारे हाताळले असून गालबोट लागू न देता शांतता व संयमाने आंदोलन सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद देत यापुढेही हीच भावना कायम ठेवून योग्य मार्गाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी कामगारांना केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी कामगारांना काही अडचण आल्यास बाजार समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
एस. टी. अप्रेंटिस संघटनेचे अध्यक्ष व श्रीकृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब ननावरे यांनी आपण एस. टी. मध्ये नोकरी करीत असल्यापासून आजपर्यंत कामगारांविषयी असलेला जिव्हाळा कायम जपल्याचे स्पष्ट करीत त्याच भावनेतून या कामगारांचे काहीतरी देणे लागतो या जाणीवेने आज या ठिकाणी मदत केली असल्याचे आवर्जून सांगितले, येथून पुढेही एस. टी. कामगारांबाबत हीच भावना कायम राहील याची ग्वाही दिली.
फलटण आगार एस. टी. सोसायटी चेअरमन माऊली कदम यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले, श्रीकृष्ण उद्योग समुहाच्या माध्यमातून बाळासाहेब ननावरे यांनी मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या किट वाटपाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.