
स्थैर्य, फलटण दि. २९: आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचच्यावतीने उपजिल्हाधिकारी राजेश जाधव यांना जिल्हाध्यक्षा सौ. मनीषा महाडिक व त्यांच्या सहकार्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.
या निवेदनाद्वारे दि. 14 जानेवारी रोजी मकर संक्रात सण असल्याने दि. 15 रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेतून महिला प्रा. शिक्षिकांना वगळण्यात यावे, 50 वर्षावरील तसेच अपंग शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे, अन्य निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक कामात असणार्या प्रा. शिक्षकांना मानधन मिळावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले, त्यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. महाडिक यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस संतोष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष जोतिराम जाधव, तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र ढमाळ, महिला तालुकाध्यक्षा सौ. मनीषा शिरटावले, उपाध्यक्षा सौ. माधवी ढवळे उपस्थित होत्या.
उपजिल्हाधिकारी जाधव यांनी एकल प्रा. शिक्षक सेवा मंचच्या मागण्यांबाबत योग्य विचार करण्याचे आश्वासन यावेळी प्रा. शिक्षकांना दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांनी सांगितले.