जर्मनीसोबतचे मैत्रिपूर्ण संबंध कायम राहतील – उद्योगमंत्री सुभाष देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२२ । मुंबई । भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा सेवा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. यानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याद्वारे महाराष्ट्रीय पद्धतीने मोऱ्हार्ड यांचा सपत्निक सत्कार केला. या सोहळ्याला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध देशांतील वाणिज्यदूत, उद्योजक तसेच उद्योग विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जर्गन मो-हार्ड २०१६ पासून भारतात सेवेत होते. मुंबई कार्यालयात सेवा बजावत असताना त्यांचे राज्य शासन आणि उद्योग मंत्री कार्यालयासोबत मैत्रिपूर्ण संबंध राहिले. इंडो-जर्मन संकल्पना पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जर्मनीतील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक संबध वृद्धींगत करण्याकामी वाणिज्यदूतांनी महत्वाची भूमिका बजावली. राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी जर्मनीतील कंपन्यांसह महावाणिज्यदूत मो-हार्ड यांनी वेळोवेळी सहकार्य केले. त्यांची मैत्री कायम स्मरणात राहील, अशा भावना श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या.

कोविड काळात जर्मनीतील कंपन्यांनी राज्य शासनाला सर्व सहकार्य दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. मो-हार्ड यांचे महाराष्ट्र आणि मुंबईसोबत कौटुंबिक नाते जुळले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतच स्थायिक व्हावे, असा सल्ला दिला.

महावाणिज्यदूत जर्गन मोऱ्हार्ड यांचा श्री, देसाई यांनी हिमरू शाल देऊन सत्कार केला तर त्यांच्या पत्नी पेट्रो यांचा श्रीमती सुषमा सुभाष देसाई यांच्या हस्ते भारतीय परंपरेची ओळख सांगणारी पैठणी साडी दिली.

भारतात आणि मुंबईत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. जर्मन आणि भारताचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. यापुढेही ते कायम राहतील. मी सेवेतून निवृत्त होत असलो तरी इंडो जर्मन नात्यातून कधीही निवृत्त होणार नाही. उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना येथील शासन भविष्यात देखील पूर्वीप्रमाणे सहकार्य करेल. भारतातील विशेषतः महाराष्ट्र शासनाने केलेले सहकार्य नेहमीच स्मरणात राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कृष्णा मोहन (बीएएसएफ), विस्टन पेरेरा, मोहित रैना, अनुपम चतुर्वेदी, डीएचएलचे संचालक सुब्रमण्यम्, सिमेन्सचे सुनील माथूर, मायकल ब्राऊन( ऑस्ट्रेलियाचे सह वाणिज्यदूत), साऊथ कोरियाचे यांग ओग किम, सिंगापूरचे चेंग मिंग फुंग आदी उपस्थित होते. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!