
सातारा – पोलीसांची तपासणी करताना डॉक्टर.
स्थैर्य, 5 मार्च, सातारा : सातारा जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सातारा यांच्या वतीने आजी-माजी पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सातारा, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा तसेच श्री शाहू कला अकादमी संचलित धर्मादाय नेत्र रुग्णालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. पोलीस सोसायटीकडून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास पोलीस बंधू-भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्या हस्ते झाले.यावेळी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस अधीक्षक (गृह) अतुल सबनीस, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक उपनिबंधक राहुल देशमुख, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज निकम, शाहू धर्मादाय रुग्णालयाचे संस्थापक राजेंद्र मोहिते, स्पंदन हॉस्पिटलचे डॉ. शिवराज गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, राखीव पोलीस निरीक्षक सुशील कदम, लायन्स क्लबचे प्रसाद देशमुख, कार्यालयीन अधीक्षक गणेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नुतन वृंदावन पोलीस वसाहतीतील व्यायामशाळेत पार पडलेल्या या शिबिरात सातारा विभागातील एकूण 422 पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी लाभार्थ्यांची सखोल तपासणी केली.
शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी, रक्त तपासणी, अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी आदी सेवा देण्यात आल्या. महिलांसाठी स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयामार्फत डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार विनामूल्य औषधांचे वाटप करण्यात आले.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या आरोग्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष होऊ नये, तसेच प्राथमिक अवस्थेतच आजारांचे निदान व्हावे या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामुळे अनेक व्याधींचे प्राथमिक स्तरावर निदान होण्यास मदत झाली.
पोलीस अधीक्षक श्री. दोशी म्हणाले आरोग्य तपासणी शिबिर प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. पोलीस कुटुंबाच्या कल्याणासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली.
अधिष्ठाता डॉ. काळे यांनी प्राथमिक आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत वेळेत निदान झाल्यास दुय्यम व तृतीय स्तरावरील गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे मार्गदर्शन केले. तसेच शासकीय रुग्णालयामार्फत वर्षातून किमान एकदा अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी ग्वाही दिली. सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत पोलीस दलाच्या आरोग्य संरक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य ठरला असून भविष्यातही अशाच आरोग्यविषयक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
