कोरोनावरील ‘फॅबीफ्ल्यु – 400’ गोळ्यांचे मोफत वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.०३: फलटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनावर उपचार घेणार्‍या गरीब कुटुंबातील रुग्णांना ‘फॅबीफ्ल्यु 400’ या महागड्या गोळ्या घेणे परवडत नाही. ही बाब लक्षात घेवून गरीब रुग्णांना या महागडया गोळ्यांचे मोफत वाटप सद्गुरु परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून सुरु असून आजवर सुमारे 125 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक तथा विजय मेडिकलचे प्रमुख विजय जाधव यांनी दिली.

या उपक्रमासाठी सुमारे 4 लाख रुपये किंमतीच्या गोळ्या प.पू.उपळेकर महाराज मंदीर ट्रस्ट मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपचारादरम्यान सदरच्या गोळ्या घेऊन अनेकजण कोरोनामुक्त झालेले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प.पू.उपळेकर महाराज मंदीर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम यशस्वी होत असून या मदतीबद्दल लाभार्थी धन्यवाद देत असल्याचे सांगून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांनी या औषधांसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीसह विजय मेडिकल, मेटकरी गल्ली, रविवार पेठ, फलटण येथे संपर्क साधावा असे आवाहनही विजय जाधव यांनी केले आहे.

‘‘प.पू.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदीर ट्रस्टच्यावतीने कोरोना रुग्णांना मोफत औषध पुरवठा ही योजना या अडचणीच्या काळात खूप उपयुक्त आहे. गरीब, गरजू रुग्णांना याचा फायदा होईल. सध्या औषधे खूप महाग व त्यात त्यांचे कृत्रिम तुटवडे करुन काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; यामुळे गरिबांना पैशाअभावी ही औषधे खरेदी करणे अशक्य होत आहे. अशा अडचणीच्या वेळेस या संस्थेने चालवलेला उपक्रम प्रशंसनीय आहे. माझ्यासारख्या गरीब रुग्णांना याचा फायदा होत आहे.
– ओंकार पवार,
रविवार पेठ, फलटण.


Back to top button
Don`t copy text!