कोव्हिड-19 वर प्रतिबंधात्मक म्हणून आर्सेनिक अल्बम 30 चे फलटण शहरात आजपासून मोफत वाटप : मुख्याधिकारी प्रसाद काटकर


स्थैर्य, फलटण, दि.18 : आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजारावर अर्सेनिक अल्बम-30 चा प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वापर केल्यास फायदा होत असल्यामुळे फलटण नगरपरिषद व आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा फलटण तसेच होमीओपॅथी डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 15,000 बॉटल्सचे वाटप फलटण शहरात आज पासून करण्यात येणार असून फलटण नगर परिषद आर्सेनिक अल्बमच्या बॉटलचे वाटप करणारी राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याचे माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना पुढे प्रसाद काटकर म्हणाले की फलटण नगरपरिषदेचा पॅटर्न भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर राबविला तर आश्चर्य वाटावयास नको. अर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांच्या बॉटल्स बरोबर मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे असेही शेवटी प्रसाद काटकर म्हणाले. आज दुपारी महाराजा मंगल कार्यालय येथे आर्ट ऑफ लिव्हिंग व होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन यांनी आर्सेनिक अल्बमच्या 15000 बॉटल्स फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे सुपूर्त केल्या. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ तसेच होमिओपॅथी डॉ.योगेश साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण भारत देशभर कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजाराचा प्रसार झपाट्याने होत असल्या कारणामुळे या साथीला आटोक्यात आणण्यासाठी या अर्सेनिक अल्बम – 30 हे औषध प्रभावी ठरत असल्यामुळेच संपूर्ण देशभर याचा वापर सुरू करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाला एक एक बॉटल मोफत देण्यात येणार असून सदरच्या बॉटलमध्ये सर्वसाधारणपणे 100 गोळ्या आहेत. या गोळ्या सोबत एक पत्रक देण्यात येणार असून या पत्रकामध्ये या गोळ्या कोणी व कशा घ्याव्यात या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सदरच्या गोळ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने घ्यावयाच्या आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हा डोस पूर्णपणे घेऊन शिल्लक राहिलेल्या गोळ्या या तशाच ठेवाव्यात त्याचा नंतर आपणाला उपयोग करता येईल मात्र उगीच डोस पेक्षा जास्त गोळ्या घेऊ नयेत असेही होमिओपॅथी डॉक्टर योगेश साळुंखे यांनी कळविले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!