दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
सातार्यातील एका व्यक्तीने सोशल मिडीयावर थायलंड ट्रीपची माहिती पाहून फोन केल्यानंतर त्याची तब्बल ३ लाख २५ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाली आहे. ट्रीपला जाण्यासाठी एअरपोर्टवर गेल्यानंतर फसवणूक झाल्याची माहिती आहे.
सातार्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कुणाल दिलीप बर्गे (वय ३३, रा. मंगळवार पेठ, सातारा) या फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुणाल दिलीप बर्गे यांनी भूपिंदर सिंग (रा. हरियाणा) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. तक्रारदार बर्गे यांनी सोशल मिडीयावर थायलंड-फुकेत ट्रीपची माहिती वाचली व त्यावर संपर्क केला. भूपींदर सिंग याने चौघांच्या खर्चाची माहिती देवून विश्वास संपादन केला. त्यानुसार बर्गे यांनी ऑनलाईन एकूण ३ लाख २५ हजार ६०० रुपये पाठवले. सिंग याने त्यानुसार बर्गे यांच्या ई-मेलवर ट्रीपची विमानाची तिकीटे पाठवली. मुंबई एअरपोर्टवर गेल्यानंतर विमानाची तिकीटे दाखवली असता तसे कोणतेही बुकिंग नसल्याचे सांगण्यात आले. बर्गे यांनी सिंग याला फोन केला असता तो बंद लागला. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बर्गे यांनी सातार्यात येवून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.