दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण येथे पुणे विभाग (महसूल) चे उपायुक्त श्री. आर. टी. शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक श्री. बी. डी. माने यांनी केला.
उपायुक्त शिंदे यांनी यावेळी संस्था व शाळेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. तसेच इ. १० वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर होताना एकाग्रतेने ध्येय साध्य करण्याचा सल्ला दिला. आपल्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना काळजीपूर्वक व मनापासून करणे व अवघड विषय सोपा करून घेण्यास सांगितले.
अशक्य काहीच नाही. प्रयत्नाने सर्व साध्य होते. परिश्रमाचे तुमच्या यशात रूपांतर होईल, असे यावेळी उपायुक्त शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. शालेय परिसर व इतर होणार्या उपक्रमांबद्दल त्यांनी यावेळी जाणून घेतले व आनंद व्यक्त केला. तसेच शिक्षकांशीदेखील त्यांनी संवाद साधला.
उपायुक्त आर. टी. शिंदे यांनी २००५ मध्ये फलटण, माण व खटावचे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे.
संस्थेच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी उपायुक्त शिंदे यांच्या भेटीबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानले.