सातार्‍यात ‘फॉरेन फंडिंग’च्या नावाखाली फसवणूक; दोघांना १७ लाखांचा गंडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२५ | सातारा |
परदेशातील कंपन्यांकडून व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे सांगून कोल्हापूर व शिराळा (जि. सांगली) येथील दोघांना सातार्‍यातील शाहूनगरमध्ये राहणार्‍या दिलीप प्रभुणे या संशयिताने १६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

या प्रकरणी दिलीप अरविंद प्रभुणे (वय ५५, रा. पारसनीस कॉलनी, शाहूनगर, सातारा) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी कुशल साताप्पा कुकडे (वय ३०, रा. आपटेनगर, कोल्हापूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही फसवणुकीची घटना फेब्रुवारी २०२४ मध्ये घडली आहे. तक्रारदार कुशल कुकडे यांना राधानगरी येथे बांबू प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज होती. ओळखीच्या माध्यमातून ते सातार्‍यातील दिलीप प्रभुणे याला ११ फेब्रुवारी २०२४ रोजी भेटले. त्याने कुकडे यांच्या दोन व्यवसायासाठी १०-१० याप्रमाणे २० कोटी रुपयांचे दुबईतून कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्यासाठी कुकडे यांच्याकडून कंपनीची कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे मागून घेतली.संबंधित कामाची प्रोसेसिंग फी म्हणून दिलीप प्रभुणे याने ६ लाख २५ हजार रुपये व कर्ज मंजूर झाल्यानंतर सक्सेस फी म्हणून १० लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार कुकडे यांनी प्रभूणे याला २ लाख २५ हजार रुपयांची बँकेद्वारे एनएफटी केली. यानंतर शर्थी, अटीचे ऑफर लेटर, करार करुन कर्जाची रक्कम मार्च २०२४ पर्यंत येईल असे सांगितले. यानंतर कुकडे हे पाठपुरावा करत होते. कर्जाची फाईल दुबई येथील टेबलवर आहे. ती फाईल काढण्यासाठी पुन्हा २२ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर संशयिताने भारतातील सेबी व आरबीआयच्या अधिकार्यांकडून फाईल अडकली असल्याचे सांगून वेळोवेळी २ लाख व कुरिअर चार्जेस लागतील असे सांगून ६५०० रुपये घेतले. इतर कारणे सांगूनही रोख रकमा घेतल्या. अशाप्रकारे वेळोवेळी १२ लाख ९० हजार रुपये घेतले. मात्र अखेरपर्यंत परदेशातील कर्ज (फॉरेन फंडिंग) मिळाले नाही. यानंतर तक्रारदारांनी संशयिताकडे पाठपुरावा केला असता त्याने टाळाटाळ केल्याने अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. दिलीप प्रभुणे याने बाजीराव जोती पाटील (रा. वाडी भागाई ता. शिराळा जि. सांगली) यांचीही फसवणूक केली आहे. त्यांची ४ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणातील संशयित दिलीप प्रभुणे हा सातार्‍यातील शाहूनगरात राहतो. त्याचे ‘प्रभुणे मॅनेजमेंट कन्सलटन्सी कंपनी’ या नावाचे कार्यालय शाहूनगर येथे आहे. त्याने आणखी काहीजणांना फसवल्याची शक्यता असल्याने सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तक्रारदारांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!