न्यायालयाच्या आदेशाने चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०७: येथील सत्यमनगर परिसरातील नेहा रेसीडेन्सी या इमारतीच्या पार्कींगमध्ये महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी जालींदर बाबुराव महानवर, छाया जालींदर महानवर, शुभम रामचंद्र चव्हाण व अन्य एक महिला (सर्व रा. नेहा रेसीडेन्सी, सत्यमनगर) यांच्यावर सातारा येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाने सातारा शहर पोलीसांनी जबरी चोरी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी व संशयित हे सर्व एकाच इमारतीत राहण्यास असून दि. 1 जून 2020 रोजी यातील फिर्यादी या नेहा रेसीडेन्सी इमारतीच्या पार्कींगमध्ये उभा असताना जालींदर यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर फिर्यादीचे दुकान इमारतीच्या कॉलमवर आपटून त्यांना जखमी केले होते. तसेच तूला पैशाची मस्ती आली आहे”, असे म्हणून त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळे वजनाची चेन चोरून नेली होती. तसेच फिर्यादीला जवळ ओढून तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करून तिला जिवंत मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, हा प्रकार पाहून रोडवरून निघालेल्या दोन व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यानंतर संशयित हे फिर्यादीची सोन्याची चेन व मंगळसुत्र घेवून पळून गेले होते. त्यानंतर जखमी फिर्यादीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी फिर्यादीने प्रथवर्ग न्यायदंडाधिकारी,सातारा यांच्याकडे दाद मागितल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा शहर पोलिसांना दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!