
दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । खटाव । कातरखटाव (ता. खटाव) येथे गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी पाच दुकाने फोडली होती. ही घटना अजून व्यापारी विसरले नाहीत. तोच रविवारी पहाटे ग्रामपंचायत परिसरातील चोरट्यांनी चार दुकानाचे शट्टर उस्कटून चार हजाराच्या रोख रखमेसह चपला, सिलेंडर टाकी, किराणा वस्तू लंपास केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील समीर फुटवेअर, जोतिर्लिंग किराणा स्टोअर्स, सह्याद्री इरिगेशन, आदिसह बोंबाळे रोडवरील चहाच्या दुकानात रविवारी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये बोंबाळे रोडवरील चहाच्या दुकानातून चार हजाराच्या रोख रखमेसह गॅसचा बाटला लंपास केला. तसेच समीर फुटवेअरच्या दुकानातून तीन चपलाचे जोड पाळविले शेजारीच असणाऱ्या जोतिर्लिंग किराणा मालाच्या दुकानातून जीवनावश्यक वस्तू लंपास केल्या असून एक ठिकाणी इलेक्ट्रिकल दुकानाचे शट्टर उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.
अशातऱ्हेने कातरखटाव ग्रामपंचायत परिसरात राहून – राहून दुकानफोडी व चोरीचे सत्र चालू असून एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावचे पोलीस पाटील घनश्याम पोरे यांनी वडूज पोलिसात नोंद दिली असून दुकानदारांना सीसीटीव्ही बसवण्याचे आव्हान केले आहे.