दैनिक स्थैर्य । दि. ८ मे २०२२ । सातारा । जागतिक आरोग्य संघटनेने करोना काळातील भारतातील मृत्यूंची आकडेवारी नुकतीच जाहीर केली या आकडेवारीत भारतातील सुमारे ४७ लाख नागरिक मरण पावल्याचे दिसून येत आहे.
परंतु, प्रत्यक्षात मोदी सरकारने खोटी आकडेवारी प्रसिध्द करून जनतेची फसवणूक केली आहे. या मोदी सरकारचा काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात येत असून भाजप सरकारने करोनातील मृत नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत करावी, अशी मागणी युवक कॉग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल डोके यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस अमोल नलवडे, शिवराज पवार, विक्रांत चव्हाण, शहानुर देसाई, अमोल शिंदे, रोहन शिंदे, रिझवान शेख उपस्थित होते.
डोके म्हणाल्या,‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार करोना काळात सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत. केंद्र सरकारने भारतात ५ लाख २१ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची फसवी आकडेवारी मांडली होती. परंतु, आता करोना काळातील खरी परिस्थिती देशासमोर आली आहे. यामधून केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचेही अपयश दिसून येत आहे. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या भाजपा सरकारने मृत नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशा मागणीचा ठराव भारतीय युवक कॉग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर झाला आहे. तसेच करोना परिस्थितीत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी लवकरच युवक कॉग्रेसच्यावतीने मदत कक्ष उभारण्यात येणार आहे.’’
श्री. जाधव म्हणाले,”आरोग्य संघटनेच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताचे चित्र खूपच भयावह दिसून असून यामधून मोदी सरकारचे अपयश समोर आले आहे. करोना काळात युवक काँग्रेसच्यावतीने सातारा जिल्हा व राज्यभरात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध करुन दिले जात होते.’’