विधिमंडळातील उत्कृष्ट सभापती म्हणून रामराजेंची ओळख : खासदार शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । रामराजेंचं जे व्यक्तीमत्व आहे, ते म्हणजे एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. रामराजे हे फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकत असताना उत्तम क्रिकेटचे खेळाडू होते; जर त्यांच्या गुडघ्याचा त्रास झाला नसता तर ते राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आपल्याला नक्कीच दिसले असते. रामराजे यांनी लॉ कॉलेजचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून उत्तम असे कामकाज केलेले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करण्यामध्ये रामराजे यशस्वी झालेले आहेत. राज्याच्या विधानपरिषदेमध्ये एक आपले वेगळे स्थान निर्माण करण्यामध्ये रामराजे यशस्वी झालेले आहे. ज्या दिवशी सभागृह चालणार नाही, असे सर्वांना वाटत असायचे त्या दिवशी सुद्धा यशस्वी रित्या सभागृह सुरु ठेवण्याचे कौशल्य रामराजेंकडे आहे. आता सध्या विधिमंडळाचा इतिहास लिहण्याचे काम सुरु आहे; त्यामध्ये रामराजेंच्या सभापती पदाच्या यशस्वी कारकिर्दीचा उल्लेख केला जात आहे. सरकार दुसऱ्या विचाराचं, बहुमत दुसऱ्याचं अश्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा विधानपरिषदेचे सभागृह चालवण्याचं काम रामराजेंनी केलेले आहे, असे मत राष्ट्रवादीचे सुप्रीमो, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

फलटण येथे “अजिंक्य राजा” या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

रामराजेंच्या अमृत महोत्सवाचा मोठा सोहळा फलटणमध्ये आपण आयोजित करणार आहोत. आज प्रकाशन झालेल्या रामराजेंच्या पुस्तकातून रामराजेंच्या आयुष्याचा काही भाग कळात आहे. फलटणला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचा भाग आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनचा जर इतिहास पहिला तर त्यामध्ये फलटणचा इतिहास बघायला मिळतो. तेंव्हा पासून ते आजपर्यँत राज्यामध्ये फलटणचे स्थान अबाधित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्या काली आदर करणाऱ्या कोण व्यक्ती होत्या तर त्यामध्ये फलटणच्या निंबाळकरांचा उल्लेख केल्याशिवाय राहता येणार नाही. यासोबतच फलटणचे जावई म्हणून फलटणचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात केला जातो. त्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास हा प्रचंड इतिहास आहे. आताच श्रीनिवास पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे फलटणच्या निंबाळकर यांचं गाव, नांव किंवा आडनाव हे निंबाळकर नव्हतं; ते पवार होत. सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आजही आहे ते म्हणजे मालोजीराजे. मालोजीराजे स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये राज्यातील महत्वाच्या खात्याची जबादारी घेतली होती. त्या काली मोठा संघर्ष होता. महाराष्ट्र एकसंघ कसा ठेवता येईल यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत श्रीमंत मालोजीराजे यांनी कामकाज केले होते. फलटणचा इतिहास हा राज्यातील सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजलेला असा इतिहास आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवार म्हणाले कि, श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटणसह परिसराचा पाण्याचा मोठा प्रश्न सोडवला. आता फलटणला व बारामतीला जे नीरा नदीवरील कालवे आहेत. त्यामध्ये फलटणला उजवा व बारामतीला डावा असे कालवे आहेत. त्यामुळे या परिसराच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्या काळीच निकाली निघाला होता. त्या कालव्यामधील पाणीवाटपामध्ये तेंव्हापासून ते आजपर्यंत कधीही डावा व उजवा असा भेदभाव उजवा कालव्यावरील जे नेतृत्व करत होते त्यांनी केले नाही. आता गाडीमधून येताना सहज बघत होतो बारामतीसह फलटण भागामध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. ह्या पिकावर प्रक्रिया करण्यासाठी त्यावेळीच श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटणसह बारामतीमध्ये कारखाने उभारले. आणि त्यामुळेच या भागाचा चेहरा बदलला; हि गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागणार आहे. त्यानंतरच्या काळामध्ये राज्याच्या पाणी प्रश्नचा ज्यांनी विचार केला त्यामध्ये राज्यातील सर्व नेत्यांच्यामध्ये रामराजेंचेच नाव दिसत असते. दुष्काळी भागामध्ये पाणी गेलं पाहिजे यासाठी रामराजेंनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. राज्यात पाणी प्रश्नामध्ये अतिशय धाडसी निर्णय जे घेतले गेले त्यांचं १०० % श्रेय हे रामराजेंनाच आहे.


Back to top button
Don`t copy text!