दैनिक स्थैर्य | दि. 12 एप्रिल 2024 | फलटण | काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. काल जे प्रवेश संपन्न झाले आहेत ते फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. फलटण शहरासह तालुक्यातील अनेक दिग्ग्ज नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत; असे मत भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केले.
फलटण शहरासह तालुक्यांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रखडलेली विकासगंगा सुरू केलेली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण शहरासह तालुक्याचा कायापालट होताना दिसत आहे. न भूतो; न भविष्यती अशी कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करीत आहेत. याबाबत आता सर्व गटातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिसत आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी अनेक जण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास इच्छुक आहेत; असेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले.
फलटण शहरासह तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवण्यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भर दिलेला आहे. सर्वसामान्य फलटणकारांची निगडित असलेल्या सर्व गोष्टी त्यामध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण ते बारामती व फलटण ते पंढरपूर रेल्वे प्रकल्प, साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय, फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यासोबतच फलटण येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुद्धा सुरू करण्याचा मानस खासदार रणजितसिंह यांचा आहे. याबाबतचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल असून येणाऱ्या काही काळामध्येच याबाबत सकारात्मक निर्णय होतील; असा विश्वास सुद्धा शहा यांनी यावेळी व्यक्त केला.
या सर्व बाबींचा विचार करता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी फलटण शहरासह तालुक्यातील अनेक माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य सुद्धा आगामी काळामध्ये प्रवेश करणार आहेत; असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.