दैनिक स्थैर्य । दि. 11 आक्टोंबर 2024 । फलटण । माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघासाठी राज्यशासनाच्या महत्त्वाच्या असणार्या लाडकी बहिण योजनेचा सन्मान सोहळा तर महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 10.00 वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर केले आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शांत न बसता आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने अॅक्टीव मोडवर आलेले आहेत. लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसातच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ रणजितसिंह यांनी पिंजून काढला. मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणूकीमध्ये भरुन काढण्याचा निर्धार सुध्दा कार्यकर्त्यांने केलेला आहे.
रणजितसिंह यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2 दिवसापूर्वी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आगामी विधानसभेबाबत बर्याच चर्चा झाल्या होत्या विविध कार्यकर्त्यांनी आपली मते परखडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर व्यक्त केलेली होती. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपा पक्षश्रेष्ठींना भेटीसाठी मुंबईला रवाना झाले होते. मुंबईवरुन आल्यानंतर नक्की रणजितसिंह विधानसभेच्या दृष्टीने कोणता निर्णय जाहीर करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.