माजी मंत्री जावेद खान यांचे निधन


 

स्थैर्य, मुंबई, दि.१: महाराष्ट्राचे माजी
मुख्यमंत्री शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात
महत्त्वाच्या खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळणारे माजी मंत्री प्रा.
जावेद खान यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

जावेद खान यांच्यावर कूपर रुग्णालयात
उपचार सुरू होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जावेद
खान यांच्या पार्थिवावर जुहू येथील मुस्लीम मजलिस कब्रस्तान येथे
अंत्यसंस्कार करण्यात आले.

जावेद खान हे मुंबईत इंग्रजीचे प्राध्यापक
होते. पुढे राजकारणात पाऊल ठेवत त्यांनी यशही संपादन केले. १९८५ मध्ये ते
काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पोहचले. त्यानंतर १९९० मध्ये सलग
दुस-यांदा त्यांनी विजय मिळवला. मुख्यमंत्री शरद पवार आणि सुधाकरराव नाईक
यांच्यासोबत त्यांनी काम केले. आधी शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांची
वर्णी लागली आणि नंतर कॅबिनेटपदी बढती देत गृहनिर्माण आणि कामगार
मंत्रालयाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन
राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर जावेद खान यांनीही
काँग्रेसला रामराम ठोकला होता. ते पवार यांच्या पक्षात सामील झाले.
राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याचवर्षी १९९९ मध्ये जावेद खान यांना सिडको
चेअरमनपदी संधी मिळाली होती.

२००४ मध्ये या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर
ते राष्ट्रवादीत अडगळीत पडले. त्यानंतर २०१२ मध्ये ते कृपाशंकर सिंह
यांच्या आग्रहावरून पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. जावेद खान हे
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रात
सातत्याने ते सक्रिय होते. ओशिवरा येथे दोन कॉलेज आणि नवी मुंबईत एक कॉलेज
अशा तीन कॉलेजच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.

जावेद खान हे मूळचे उत्तर प्रदेशातील
होते. जौनपूर जिल्ह्यात शाहगंज तहसील क्षेत्रात कमाल हे त्यांचे गाव.
मुंबईत ते जुहू येते वास्तव्याला होते. नदीम जावेद हे त्यांचे पुत्र असून
ते जौनपूरच्या राजकारणात सक्रीय आहेत. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे
अध्यक्ष असलेले नदीम जावेद हे २०१२ च्या निवडणुकीत जौनपूर शहर विधानसभा
मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!