दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता; परंतु त्यांचे तिथे मन रमत नव्हते, म्हणून काल महादेव पोकळे यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू बाळासाहेब पोकळे व त्यांचे सहकारी पांडुरंग गुळदगड यांनी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी संघर्ष समितीचे अॅड. नरसिंह निकम, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य व युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सचिन कांबळे पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना महादेव पोकळे म्हणाले की, मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला; परंतु माझे मन त्या ठिकाणी रमत नव्हते. त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा मानसन्मान जपला जात नाही. तसेच या तालुक्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्याचा विकास करत आहेत. त्यामध्ये निरा-देवघर मार्फत पाण्याचा प्रश्न असेल; बारामती-फलटण रस्ता असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये मार्गी लावण्याचे काम खासदार निंबाळकर करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्वगृही येण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. भविष्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा जो डोंगर उभा केलेला आहे, त्यांना यापुढे साथ देणार आहे व तालुक्यामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने जिंकेल यासाठी खासदारांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. लवकरच सोमंथळी येथे मेळावा घेऊन अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, असेही महादेव पोकळे यांनी सांगितले.
यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचे भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत केले. महादेव पोकळे यांचा भाजपमध्ये योग्य तो सन्मान केला जाईल, असे आश्वासन खासदार रणजितसिंह यांनी दिले.