शून्यातून विश्व निर्मिती म्हणजे काय याचा खरा अर्थ समजावून घेण्यासाठी आरडगाव, ता. फलटण या कायम दुष्काळी पट्ट्यातील छोट्या खेड्यातून मुंबईत आणि तेथून पुन्हा फलटण शहरात येऊन आपले नशीब आजमावताना त्याला बुद्धिकौशल्य, कल्पकता आणि मेहनतीची जोड देऊन सर्वांच्या एकजुटीतून अहोरात्र कष्टाने उभारलेल्या भोईटे विश्वाची, तेथील कौटुंबिक एकवाक्यतेची, सतत कष्ट उपसणार्या प्रत्येकाची जीवनशैली अभ्यासावी लागेल.
फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे व्यक्तिमत्व हे फलटण शहरासह तालुक्याला सर्वश्रुत नेतृत्व आहे. फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वॉर्डसह फलटण शहरामध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. वेळ प्रसंगी नंदकुमार भोईटे हे प्रशासनाची वाट न बघता थेट स्वखर्चातून कामे मार्गी लावत असतात. त्यांची एक वेगळीच प्रतिमा संपूर्ण फलटण शहरातील नागरिकांना माहित आहे. एखादा गरजू जर नंदकुमार भोईटे यांच्याकडे गेला तर तो कधीही रिकाम्या हाताने माघारी येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे थेट आपली कामे घेवून नंदकुमार भोईटे यांच्याकडे जात असतात. मागील वर्षी कोरोनाचे महाभयंकर संकट हे आपल्या सर्वांच्या पुढे येऊन उभे राहिले. मागील वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर लगेचच नंदकुमार भोईटे यांनी स्व:खर्चातून फलटण शहरातील गरजू नागरिकांना अन्नधान्य व भाजीपाला किट्सचे वाटप केले. त्यानंतर ह्या वर्षी सुद्धा लॉक डाऊन झाल्यानंतर नंदकुमार भोईटे यांनी अन्नधान्य व भाजीपाला किट्सचे वाटप केले. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला काळ्या रात्रीही धावून जात असणारे नंदकुमार भोईटे हे सर्वसामान्य नागरिकांचे तारणहार बनलेले आहेत.
स्व. आबाजी भोईटे व स्व. सजाबाई भोईटे या माता-पित्यांची अरुण, अशोक, शामराव, नंदकुमार ही 4 मुले व सौ. सुमन व सौ. प्रभावती या 2 मुली अशा मोठ्या कुटुंबाचा चरितार्थ मुंबईतील इलेक्ट्रिक दुकान व व्यवसायाच्या माध्यमातून चालविताना आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण, आदर्श संस्कार आणि उत्तम आरोग्य लाभले पाहिजे याला प्राधान्य देत आपली वाटचाल सुरु ठेवली. मुले वाढत होती, शिकत होती, सुसंस्कारित होत होती, त्या दरम्यान स्व. आबाजी भोईटे यांनी पत्नी सौ. सजाबाई भोईटे यांच्याशी चर्चा करुन आपला कुटुंब कबिला मुंबईतून फलटण येथे स्थलांतरित केला. पत्नी, मुले फलटण येथे वास्तव्यास ठेवून त्यांचे शिक्षण व संस्काराची जबाबदारी पत्नीकडे होती.
मुले शिकत मोठी होत असताना त्यापैकी सर्वात धाकटे चिरंजीव नंदकुमार भोईटे यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भार पेलवताना आई-वडीलांची होत असलेली कसरत पाहिल्यानंतर त्यांना त्यामध्ये मदत केली पाहिजे हे ओळखून भांडवलाशिवाय व्यवसाय कसा करावा या विवंचनेतून मुंबईचे भोईटे इलेक्ट्रिकल्सची शाखा येथे सुरु केली. व्यवसायातील अनुभव, प्रस्थापितांशी स्पर्धा, लगेच जम बसविणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन अन्य व्यवसाय निवडण्याचा प्रयत्न करीत इलेक्ट्रिकल्स व्यवसायाची जबाबदारी थोरल्या बंधूंकडे सोपवून स्वतः शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टस् मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना चांगले यश मिळत गेले, अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि साथ लाभल्याने त्यांनी त्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यांतर्गत अन्न धान्य वितरण विभागाचे धान्य वाहतुकीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली एकेक जिल्हा करीत 2/3 जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण व वाहतुकीची जबाबदारी घेतल्यानंतर त्यासाठी असलेली वाहने दुसर्यांकडून भाड्याने घेताना ते परावलंबी आणि अडचणीचे ठरु लागल्यानंतर स्वतःची वाहने असली पाहिजेत हे नक्की झाल्यानंतर आज भोईटे कुटुंबियांकडे स्वतःचे 20/25 ट्रक असून त्या माध्यमातून अन्न धान्याची वाहतूक हा एक व्यवसाय उत्तम प्रकारे सुरु आहे.
त्याच्या जोडीला राज्य शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत बाल पोषण आहार योजनेची जबाबदारी स्वीकारुन 2/3 जिल्ह्यातील प्रा. शाळांना बाल पोषण आहार पोहोच करण्याची जबाबदारी भोईटे कुटुंबीयांनी स्वीकारली त्या माध्यमातून स्वतःचे ट्रक्स आणि मनुष्यबळ वापरुन नंदकुमार भोईटे यांनी स्वतः लक्ष घालुन प्रत्येक शालेलाच नव्हे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार पोषण आहार मिळेल यासाठी विशेष मेहनत घेतली.
स्वतः नंदकुमार भोईटे हे सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना सर्वांची एकजूट आणि एकवाक्यता याला प्राधान्य देऊन सर्व व्यापार, व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या विचारांचा आदर करीत आपली जबाबदारी निभावताना कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घेत कार्यरत असल्याने एक उद्योगशील यशस्वी कुटुंब म्हणून आज या कुटुंबाचा फलटण करांना अभिमान आहे. प्रारंभीच्या काळात विद्यार्थी संघटना, नंतर आरडगावचे उपसरपंच, फलटणचे नगरसेवक, उपाध्यक्ष, नगराध्यक्ष असे गेली 30/35 वर्षे सक्रिय राजकारण व समाजकारणात असलेल्या नंदकुमार आबाजी भोईटे यांनी आपल्या बुद्धिकौशल्य व निर्णयक्षमतेच्या आधाराने सार्वजनिक जीवनातही अनेक चांगले, सेवाभावी, लोकांच्या हिताला प्राधान्य देणारे उपक्रम प्रभावी रीतीने राबविले आहेत.
सलग 35 वर्षे नगर परिषदेत निवडून जात असताना शहर विकासाच्या अनेक संकल्पना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वीरित्या राबविल्या आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील डेक्कन चौक परिसर नामकरण व सुशोभीकरण होय. फलटण तालुक्यात आलेल्या कृष्णेच्या पाण्याने संपूर्ण तालुका 100 % बागायत होत असताना, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी, कमिन्स इंटरनॅशनल कंपनीची अनेक युनिट उभी रहात असताना झालेला औद्योगिक विकास, शिक्षण क्षेत्रात उभी राहिलेली नर्सिंग, कृषी, फलोद्यान, अभियांत्रिकी महाविद्यालये, नगर पालिका, बाजार समिती, सहकारी दूध संघ व गोविंद मिल्क प्रॉडक्टस सारख्या खाजगी संस्थांनी केलेली प्रगती शहरी भागातील उद्योगपती, व्यापारी, व्यावसाईक यांना भुरळ घालणारी ठरल्याने फलटण शहर व परिसरात शहरी लोकांची वस्ती वाढत असताना त्यांना आवश्यक नागरी सुविधा, हॉटेल्स, करमणूक साधने उपलब्ध करुन देण्याची गरज अनेकांनी चोखपणे हेरली आणि अनेक उद्योग सुरु केले, त्यापैकी एक चाणाक्ष उद्योजक म्हणून नंदकुमार भोईटे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
– प्रसन्न रुद्रभटे,
संपादक, स्थैर्य.