दैनिक स्थैर्य | दि. 27 डिसेंबर 2023 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज माढा लोकसभा मतदारसंघातील शिष्टमंडळासह अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे वक्तव्य नुकतेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले होते. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध हालचालींना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.
फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2019 साली माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खासदार झाले. 2019 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण मदत केल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर 2019 साली खासदार झाले होते.
मोहिते – पाटील कुटुंबांमधील असणारे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी दिवाळीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर अनेकदा त्यांनी उघडपणे आपणच भारतीय जनता पार्टीच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहोत असे स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांची घेतलेली भेट ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी भेटीदरम्यान विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते – पाटील, माजी आमदार प्रभाकर घारगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.